पिंपरी : विवाहितेशी गैरवर्तन करून तसेच फोनवरून अश्लील बोलून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी माजी नगरसेवकाच्या भावाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरी येथे २६ ऑक्टोबर आणि २७ डिसेंबर २०२४ रोजी ही घटना घडली.
चेतन बाबासाहेब ननावरे (रा. फुलेनगर, पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय पीडित विवाहितेने शनिवारी (दि. २८) संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भारतीय न्याय संहिता कायदा कलम २०२३ च्या कलम ७४, ७५, ७९ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंद केला. यातील संशयित चेतन ननावरे हा माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा भाऊ आहे.
संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, चेतन ननावरे याने पीडित विवाहित महिलेसोबत गैरवर्तन केले. ‘‘मी तुला सांभाळतो, मी तुला सांगतो तू एवढे का वाढीव करीत आहे, असे तो पीडितेला म्हणाला. ‘‘दरवाजा उघडा ठेव मी येतो’’, असे फोन करून म्हणाला. फिर्यादी पीडित विवाहितेच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी विवाहितेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पेालिस उपनिरीक्षक गणेश आटवे तपास करीत आहेत.