flu increased in the pimpri chinchwad city | उद्योगनगरी तापाने फणफणली
उद्योगनगरी तापाने फणफणली

ठळक मुद्दे डेंगी, मलेरिया, चिकुनगुणिया आणि स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले

विश्वास मोरे-  
पिंपरी : वातावरणातील बदलाने पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी तापाने फणफणली असून, महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयेही फुल्ल झाली आहेत. गेल्या दहा महिन्यांत शहरात ७१ हजार ५४६ तापाचे रुग्ण आढळले आहेत. डेंगी, मलेरिया, चिकुनगुणिया आणि स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले आहे. त्यामुळे ताप उतरविण्याचे मोठे आव्हान आरोग्य आणि वैद्यकीय विभागासमोर आहे. रुग्ण वाढत असले तरी साथीच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण यावर्षी घटल्याचे दिसून येत आहे. जुलैमध्ये सुरू झालेला पावसाळा नोव्हेंबरपर्यंत कायम आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि सायंकाळी पाऊस असा वातावरणात बदल होत असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. दहा महिन्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर तापाचे रुग्ण वाढत असून, मलेरिया, डेंगी आणि स्वाइन फ्लू सदृश्य रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. तापाने शहर फणफणले आहे. याबाबत उपाययोजना म्हणून महापालिकेच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने प्रबोधन, जागृतीपर उपक्रम राबविला आहे. प्रभाग निहाय आरोग्य कर्मचाºयांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. 
......
मलेरिया 
लक्षणे - ताप, थंडी वाजणे, सांधे दुखणे, उलट्या होणे
....
चिकुनगुनिया
लक्षणे - आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक काळ ताप येणे, डोकेदुखी, तीव्र सांधेदुखी, अन्नावरची इच्छा उडणे किंवा उलट्या होणे, डोळ्यांचा दाह होणे.
........
.डेंग्यू
लक्षणे - ताप, स्नायू दुखणे, सांधे दुखी, डोके दुखी, अन्नावरची इच्छा उडणे, पुरळ उठणे.
......... 
हे जरूर करार
पाणी उकळून, गाळून प्या, ताजे शिजलेले अन्न खा, खाण्याआधी हात स्वच्छ धुवा, साचलेल्या पाण्यातून चालू नका, पायाची जखम उघडी ठेवू नका, बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा, घराच्या परिसरात साचलेले पाणी काढून टाका 
........

न शिजवलेले पदार्थ खाऊ नका, चटणी खाणे टाळा, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, स्टॉल्स, खाण्याच्या गाड्यांवरचे पाणी पिऊ नका, ताप २ ते ३ दिवसांपर्यंत अंगावर काढू नका, स्वत:च औषधे घेणे टाळा, पावसात अधिक काळ भिजू नका
....
चार महिन्यांत
झाली वाढ
हिवाळ्याचा महिना सुरू झाला असताना पावसाचे प्रमाण आहे़ वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढतात. जलजन्य आजारांचेही प्रमाण वाढत असते. दूषित पाण्यामुळे सर्दी, खोकला किंवा उलट्या,  ताप अशी लक्षणे आढळून येत असतात. स्वच्छ पाणी साचून डेंगीचे डास निर्माण होत असतात. त्यामुळे उपाययोजना म्हणून रुग्णांवर उपचार, तपासणी करून निदान करणे, तसेच आरोग्य विभागातर्फे  स्वच्छतेसाठी कीटकनाशकांची फवारणी केली जाते. डास निर्माण होणाºया डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून उपाययोजना करण्याचेही काम केले जाते. तसेच प्रबोधनही केले जाते. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच परिसर स्वच्छता आणि पाणी साचणार नाही अशी दक्षता घेणे गरजेचे आहे. - डॉ. पवन साळवे, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख
......
रुग्णालयात बेड उपलब्ध होईनात?
महापालिकेच्या वतीने शहर परिसरात दवाखाने, बाह्यरुग्णसेवेसाठी २६ रुग्णालये कार्यरत असून खासगी रुग्णालयांचीही संख्या अधिक आहे. महापालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि चिंचवड येथील कामगार विमा रुग्णालय, नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयातही साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.  
डेंगी सदृष्य तापाचे रुग्ण अधिक
चार महिन्यांत डेंगी सदृश्य तापाचे रुग्ण वाढले आहेत. जुलैमध्ये १०७, आॅगस्टमध्ये २८१, सप्टेंबरमध्ये ५३१, आॅक्टोबरमध्ये ९४८ असे १८६७ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १३० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून तर एनएसवनचे रुग्ण ५४ असल्याचे आढळून आले आहे. मात्र, डेंगीमुळे शहरात एकही मृत्यू झालेला नाही.
........ 
वातावरणातील सततच्या बदलामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला यासारखे आजार बळावतात. शरीराची प्रतिकारकशक्ती संतुलित ठेवण्यासाठी शरीरात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याचे योग्य सेवन करणे. तसेच रुग्णांमध्ये ताप, सर्दी अशा आजारांची लक्षणे आढळल्यास त्वरित वैैद्यकीय अधिकाºयांचा सल्ला घ्यावा.-डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.
.................
महिना    तापाचे रुग्ण    मलेरिया    डेंगी    चिकुनगुनिया    स्वाइन फ्लू
        पॉझिटिव्ह        मृत्यू    सदृश्य        पॉझिटिव्ह    सदृश्य    पॉझिटिव्ह    पॉझिटिव्ह    मृत्यू
जानेवारी    ५,८१३    ०        ०    ८६        ०    ०        ०    ५    ०
फेब्रुवारी    ५,२८१    ०        ०    १५        ०    २        ०    ७    १
मार्च    ४,८०१    ०        ०    ९        ०    २        ०    ०    ०
एप्रिल    ५,८४१    ०        ०    १९        ०    ०        ०    ४    १
मे    ५,३८७    ०        ०    १९        ०    ०        ०    ०    ०    
जून    ५,१६८    ०        ०    ४३        ०    ०        ०    १    १
जुलै    १०,२१८    ३        ०    १०७        २८    ०        ०    २    ०
आॅगस्ट    १२,३९२    ४        ०    २८१        ४०    ०        ०    ०    ०
सप्टेंबर    ८,५४६    ०        ०    ५३१        ४४    २        ०    ०    ०
आॅक्टोबर    ८,०९९    २        ०    ९४८        ६३    ०        ०    ०    ०    
एकूण    ७१,५४६    ९        ०    २,०५८    १८४    ६        ०    १९    ३
 

Web Title: flu increased in the pimpri chinchwad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.