बोगस एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल; पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 09:25 PM2021-01-27T21:25:32+5:302021-01-27T21:26:07+5:30

बनावट बॅंक गॅरंटी सादर करून मिळवली होती ५२ कामे

Five contractors charged in bogus FDR case; Fraud with Pimpri Chinchwad Municipal Corporation | बोगस एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल; पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक 

बोगस एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल; पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक 

Next

पिंपरी : बोगस एफडीआर सादर करून पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापत्य विषणक कामे मिळविल्याप्रकरणी पाच ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. बोगस एफडीआर सादर करून पाच ठेकेदारांनी ५२ कामांचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. महापालिकेची कामे घेताना एफडीआर अथवा बँक गॅरंटी द्यावी लागते. मात्र यात बोगस एफडीआर सादर केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हाेते.  

महापालिकेच्या लेखा विभागाचे अधिकारी रमेशकुमार विठ्ठलराव जोशी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २६) फिर्याद दिली. त्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले. फसवणुकीचा पहिला गुन्हा मे. पाटील अँड असोसिएटचे मालक सुजित सूर्यकांत पाटील (वय २६, रा. भोसरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. पाटील अँड असोसिएटने महापालिकेची पाच कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक, आळंदी शाखा यांचा एफडीआर सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे.
फसवणुकीचा दुसरा गुन्हा मे. कृती कन्स्ट्रक्शनचे मालक विशाल हनुमंत कुऱ्हाडे (वय २९, रा. पिंपरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला. मे. कृती कन्स्ट्रक्शनने महापालिकेची चार कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक, आळंदी शाखा यांचा बनावट एफडीआर सादर केला.

फसवणुकीचा तिसरा गुन्हा मे. एस. बी. सवईचे मालक संजय बबन सवई (रा. चिंचवड) यांच्या विरोधात दाखल केला. मे. एस. बी. सवईने महापालिकेची सात कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक, आळंदी शाखा यांचा बनावट एफडीआर सादर केला. 

फसवणुकीचा चौथा गुन्हा मे. वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद जीवन मळगे (वय ४७, रा. भोसरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला. मे. वैदेही कन्स्ट्रक्शनने महापालिकेची १२ कामे घेतली होती. त्यात त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, राजगुरू नगर शाखा, पंजाब नॅशनल बँक नाना पेठ पुणे यांचा बनावट एफडीआर महापालिकेला सादर केला.   

फसवणुकीचा पाचवा गुन्हा मे. डी. डी. कन्स्ट्रक्शनचे मालक दिनेश मोहनलाल नवानी (वय २८, रा. पिंपरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मे. डी डी कन्स्ट्रक्शनने महापालिकेची २४ कामे घेतली होती. त्यात त्यांनी पंजाब नॅशनल बँक नाना पेठ पुणे शाखा यांचा बनावट एफडीआर सादर केला.  

‘त्या’ ठेकेदारांवर कधी गुन्हे दाखल होणार?
महापालिकेची विविध कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांमध्ये चढाओढ असते. असे करताना काही ठेकेदारांनी बोगस एफडीआर सादर केल्याचे समोर आले. याप्रकरणी १८ ठेकेदारांना दोषी धरण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते. त्याबाबत पोलिसांना पत्र देखील दिले होते. मात्र महापालिकेकडून तक्रारदार पुढे येत नव्हता. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याबाबत अडचणी येत होेत्या. त्याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी (दि. २६) सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर मंगळवारी पाच ठेकेदारांविरोधात गुन्हे दाखल केले. मात्र उर्वरित १३ ठेकेदारांचे काय, त्यांच्यावर गुन्हे कधी दाखल होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Five contractors charged in bogus FDR case; Fraud with Pimpri Chinchwad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.