पिंपरी : मोशी कचरा डेपोला मंगळवारी (दि.०४) दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली. उघड्यावर टाकलेल्या या कचऱ्याने पेट घेतल्याचे प्रथमदर्शीनी माहिती दिली.
दरम्यान, कचऱ्याला लागलेली आग ही उन्हामुळे लागला असल्याचा अंदाज महापालिका प्रशासनाने वर्तवला आहे. घटनेची माहिती मिळताच, मुख्य अग्निशमन दलासह भोसरी येथील पथकही मोशी येथे पोहोचले.
अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. पाण्याचा मारा करुनही आगीवर नियंत्रण मिळविता येत नव्हते. आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत अथक प्रयत्न केले जात होते. अखेरीस पर्यावरण विभागाकडून या कचऱ्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी माती टाकून आग विझवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
उन्हाळ्यामुळे तापमान वाढल्याने कचऱ्याचा ढिगाऱ्याखाली मिथेन वायुची निर्मिती होते. हवेचा दाब निर्माण झाल्याने ज्वलनशील वायूचे उत्सर्जन होऊन आगीची घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.
मोशी कचरा डेपो मध्ये मंगळवारी कचऱ्याला लागलेली आग ही उन्हामुळे लागली आहे. याबाबत ठेकेदाराची चूक आहे का याची चौकशी केली जाईल. आग लागलेल्या कचऱ्यावर माती टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग