नेहरूनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटल सेंटरमध्ये कोरोना योद्ध्यांची आर्थिक छळवणूक; मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 20:27 IST2020-10-20T20:25:22+5:302020-10-20T20:27:05+5:30
रुग्णसेवा देणाऱ्या परिचारिकांना गेल्या दीड महिन्यांपासून वेतन दिले गेले नाही..

नेहरूनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटल सेंटरमध्ये कोरोना योद्ध्यांची आर्थिक छळवणूक; मनसेचे आंदोलन
पिंपरी : रेड कार्पेट टाकून पीएमआरडीएने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या नेहरूनगर येथील जम्बो कोविड हॉस्पीटलमध्ये परिचारिकांची आर्थिक छळवणूक होत असून त्याविरोधात मंगळवारी परिचारिकांनी आंदोलन केले.
कोरोनाचा आलेख वाढत असताना राज्य शासनाच्या वतीने पीएमआरडीच्या माध्यमातून नेहरूनगर येथे कोविड हॉस्पीटल सुरू केले होते. या ठिकाणी रुग्णसेवा देणाऱ्या परिचारिकांना गेल्या दीड महिन्यांपासून वेतन दिले गेले नाही. याबाबत परिचारिकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याची दखल घेऊन मनसेच्या वतीने मंगळवारी दुपारी आंदोलन केले. यावेळी मनसेचे गटनेते सचिन चिखले, पुण्यातील नगरसेविका रुपाली पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना योद्धांचा अपमान करणाऱ्या कोविड केअर हॉस्पिटल संचालकांची निषेध करण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
रुपाली पाटील म्हणाल्या, ‘‘जंम्बो हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या ३८ नर्सेसला दीड महिन्यांपासून वेतन दिले नाही. तसेच तीन महिन्यांचा करार असताना त्यांना कामावरुन काढून टाकले आहे. ही बाब चुकीची असून रुग्णालय चालकांकडून परिचारिकांना धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत आम्ही पालकमंत्री आणि पीएमआरडीए प्रशासनाची भेट घेऊन हॉस्पिटलमधील कारभाराविषयी तक्रार करणार आहोत. आघाडीच्या सरकारमध्ये भाजपावाल्यांचे टेंडर आहेत. हे कसे काय? ’’
मनसे गटनेते सचिन चिखल म्हणाले, ‘‘२२ ते ३० हजार रुपये प्रतिमहिना परिचारिकांना द्यायचे कबूल केले असताना केवळ पाच हजार रुपये देऊन कामावरून कमी केले जात आहे. हा कोरोनायोद्धांचा अपमान आहे. काल रात्री परिचारिकांना फुटपाथवर रहावं लागले. जेवण राहणं हवं. परिचारिकांना पूर्णपणे वेतन द्यायला हवे.’’
......
वेतन द्यायलाच हवे..
परिचारिकांची तक्रार आल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी दखल घेऊन रुग्णालय संचालकास झापले. ढोरे म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या काळात योद्धा म्हणून काम करणाऱ्या परिचारिकांना कामावरून काढून टाकणे चुकीचे आहे. ठेकेदाराने वेळेत वेतन दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोणाचेही वेतन थकविता कामा नये.’’
......
पीएमआरडीकडे तक्रार करणार..
सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘‘जम्बो कोवीड हॉस्पिटलची जबाबदारी पीएमआरडीएकडे आहे. परिचारिकांना काम करून वेतन दिले जात नसेल तर चुकीची बाब आहे. याबाबत पीएमआरडीए प्रशासनाशी बोलणार आहे. कामगारांचे वेतन द्यायलाच हवे.’’