जुन्या वाड्यांना नोटीस देण्याचा फार्स
By Admin | Updated: July 6, 2016 03:20 IST2016-07-06T03:20:01+5:302016-07-06T03:20:01+5:30
‘नेमिची येतो पावसाळा...’ यानुसार पिंपरी-चिंचवड परिसरातील जुन्या वाड्यांना नोटीस देण्यापलीकडे महापालिका कोणतीही ठोस कारवाई करीत नाही

जुन्या वाड्यांना नोटीस देण्याचा फार्स
पिंपरी : ‘नेमिची येतो पावसाळा...’ यानुसार पिंपरी-चिंचवड परिसरातील जुन्या वाड्यांना नोटीस देण्यापलीकडे महापालिका कोणतीही ठोस कारवाई करीत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे १०५ धोकादायक इमारतींमध्ये शेकडो नागरिक वास्तव्यास आहेत. जुन्या वाड्यांत राहणाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. धोकादायक इमारतींच्या मालकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
शहराची निर्मिती गाव ते महानगर अशी आहे. गावांचे एकत्रीकरण करून नगरपालिका आणि महापालिकेत रूपांतर झाले. त्यामुळे गावठाणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जुने वाडे, इमारती आहेत. त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पावसाळा आला की, नालेसफाई, जलपर्णी काढण्याचे अभियान, तसेच जुन्या इमारतींना नोटिसा देण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ प्रशासकीय सोपस्कार म्हणून कामे करण्यास प्राधान्य दिले जाते. नोटीस देण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई महापालिका प्रशासनाकडून होत नाही. चिंचवड, भोसरी, पिंपरीतील जुन्या वाड्यांमध्ये नागरिक वास्तव्यास आहेत. गावठाणाच्या परिसरात घराला लागून घरे बांधलेली आहेत. तर काही इमारतींवर छोटी झाडे, वेलीही उगवली आहेत. काही धोकादायक इमारत आणि दुसऱ्या इमारतींचीही भिंत लागूनच आहे. पावसामुळे जर धोकादायक इमारत कोसळली, तर अन्य घरांनाही धोका पोहोचू शकतो. चिंचवड, भोसरी, चऱ्होली, पिंपरीत अधिक जुन्या इमारती आहेत. (प्रतिनिधी)
१०५ जुन्या इमातींना नोटीस
- महापालिका परिसरातील अ, ब, क, ड, इ, फ या सहा प्रभागांतील जुन्या १०५ इमारतींना गेल्या वर्षी नोटीस दिल्या आहेत. या वर्षीही नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. मात्र, विभागनिहाय आकडेवारी महापालिकेकडे उपलब्ध नाही. यंदाही धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्याचे काम सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
एकत्रित माहिती नाही
- महापालिका क्षेत्रात विभागवार माहिती स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे एकत्रित माहिती नाही. माहिती घ्यावी लागेल, असे उत्तर देऊन अधिकारी मोकळे होतात. अनधिकृत बांधकामांसारखी यादी तयार करून ही माहिती आॅनलाइन उपलब्ध करून दिल्यास नागरिकांनाही त्यांचा उपयोग होईल.
चिंचवड, भोसरी, पिंपरीत धोकादायक वाडे अधिक
- गावठाणांच्या परिसरात धोकादायक इमारती, वाडे यांची संख्या आधिक आहे. चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, निगडी, थेरगाव, वाकड, पिंपळे गुरव, निलख, चिखली, भोसरी, दिघी, चऱ्होली, दापोडी, बोपखेल या भागातील गावठाणात जुनी घरे, वाडे अधिक आहेत. त्याची अवस्था दयनीय झालेली आहे. जुन्या घरांच्या इमारतीच्या भिंती कधीही पडू शकतात, अशा स्थितीत आहेत. तसेच निगडी गावठाण, आकुर्डी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जुनी घरे असून, ती घरे कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या घरमालकांनाही नोटीस देण्याची आवश्यकता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अ, ब, क, ड, इ, फ या सहाही प्रभागांतील धोकादायक इमारतींना नोटीस देण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळू शकतात. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये नागरिकांनी वास्तव्य करून जीव धोक्यात घालू नये. विभागवार माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.
-शिरिष पोरेड्डी, प्रवक्ते, महापालिका