अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणेंच्या सूनेचे टोकाचे पाऊल, माहेरच्यांकडून गंभीर आरोप
By नारायण बडगुजर | Updated: May 17, 2025 19:41 IST2025-05-17T19:35:33+5:302025-05-17T19:41:23+5:30
- सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केल्याबाबत माहेरच्यांकडून तक्रार

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणेंच्या सूनेचे टोकाचे पाऊल, माहेरच्यांकडून गंभीर आरोप
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी (दि. १६ मे) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन वैष्णवी हिच्या मृत्यूस कारणीभूत झाले आहेत, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.
वैष्णवी यांचे वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे (५१, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी शनिवारी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैष्णवी हिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करीश्मा राजेंद्र हगवणे, दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांनी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. काही वेळानंतर पती शशांक हगवणे यांनी दरवाजा ठोठावला. पत्नी वैष्णवी हिने दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडला. त्यानंतर ही घटना समोर आली. वैष्णवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे की, वैष्णवी हिचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी यांना क्रूर वागणूक दिली. मारहाण करून तिला जाच करून तिच्या मृत्यूस कारणीभूत झाले, असे फिर्यादीत नमूद आहे.