पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये जमावबंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 02:55 AM2018-12-15T02:55:14+5:302018-12-15T02:55:38+5:30

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी वीस डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

Enforce ban in Pimpri-Chinchwad city area | पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये जमावबंदी लागू

पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये जमावबंदी लागू

Next

पिंपरी : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियमानुसार पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिनांक २० डिसेंबर रात्री बारापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. जमावबंदी लागू केली आहे.

पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पद्मनाभन म्हणाले, ‘‘प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा बाळगणे, कोणत्याही इसमाचे, चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांचे चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सभ्यता अगर नीतिमत्ता राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल, असे वर्तन करणे यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मिरवणूक काढणे, भाषण करणे, आविर्भाव करणे, सभा घेणे, जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

जागेच्या वादातून तिघांना मारहाण; एकावर गुन्हा
पिंपरी : जागेच्या वादातून तिघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास निगडी, प्राधिकरणातील काचघर चौकाजवळ घडली. विलास पंढरीनाथ कुटे (वय ५०, रा. सेक्टर नं. २६, निगडी, प्राधिकरण) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मनोज रघुनाथ बोरसे (वय ४९, रा. पिंपळे सदन सहकारी संस्था, कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जागेच्या वादातून कुटे याने बोरसे व त्यांचे मित्र संजय पवार, अतुल पासले यांना शिवीगाळ केली. तसेच बोरसे यांना लाकडी बांबूने मारहाण केल्याने त्यांचा डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. यासह त्यांचे मित्र पवार व पासले यांनाही लाकडी बांबूने मारहाण करीत जखमी केले. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विनयभंगप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या एकाने घरातील महिलेचा विनयभंग केला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास नवºयाला मारून टाकीन, अशी धमकी दिली. ही घटना चिखली येथे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. दादा मोहन पिसाळ (वय २६, रा. भीमशक्तीनगर, मोरे वस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी आरोपी संबंधित महिलेच्या घरी आला, तसेच पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर त्याने महिलेचा हात पकडला. ‘तू मला खूप आवडतेस, माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत महिलेशी अश्लील चाळे केले. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास नवरायाला मारून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

फसवणूक प्रकरणी चार जणांवर गुन्हा
वडगाव मावळ : जमिनीचे बनावट दस्त तयार करून संगनमताने खरेदीखत करून जमीनमालकाची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. होमी रूसी इराणी (वय ६५, रा. मंगल आरती सेंट रोड बांद्रा, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी योगेश रवींद्र जाधव (वय २९, रा. मुंढवा पुणे) रियाज गुलाम कुरेशी (वय ३२, रा. सोमवारपेठ, पुणे) मोहम्मद मुजलिम आरिफ (वय २४, रा. मोतीलालनगर, औरंगाबाद) व चौथा नाव पत्ता माहीत नाही, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, होमी इराणी यांच्या मालकीची आतवण येथे सर्वे क्रमांक २५ मधील ४० आर क्षेत्र असलेल्या जमिनीचे बनावट दस्त संगनमताने तयार करून आरोपीने दुय्यम निबंधक कार्यालयाला सादर केले.

 

Web Title: Enforce ban in Pimpri-Chinchwad city area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.