Maharashtra Election 2019: ''सत्तर हजार कोटी गेले कुठे चौकशी करायला नको''
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 22:48 IST2019-10-11T22:47:19+5:302019-10-11T22:48:45+5:30
न बोलवताच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात गेले. बोलावल्यानंतर जावेच लागेल.

Maharashtra Election 2019: ''सत्तर हजार कोटी गेले कुठे चौकशी करायला नको''
पिंपरी : न बोलवताच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात गेले. बोलावल्यानंतर जावेच लागेल. बँक घोटाळा, सिंचनातील सत्तर हजार कोटी कुठे गेले याची चौकशी व्हायला नको, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरीतील सभेत केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मैदानावर शिवसेनेची सभा झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा सदस्य अमर साबळे, महापौर राहुल जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, उपनेत्या डॉ. नीलम गो-हे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, डॉ. रघुनाथ कुचिक आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात आम्ही ठरवलय युतीचेच सरकार येणार आहे. गोरगरिबांच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी युती केली आहे. लोकसभेला विरोधी पक्ष थोडा तरी शिल्लक होता. आता विधानसभेच्या निवडणुकीतही तोही शिल्लक नाही. काही ठिकाणी उमेदवारही दिले नाहीत. त्याच्याकडून नाराज होऊन नेते बाहेर पडताहेत. उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावरून विरोधीपक्षाची अवस्था लक्षात येईल. युतीसरकार लक्ष्य करीत आहेत, ही पवारांची टीका चुकीची आहे. दहा रुपयात जेवण, एक रूपयात आरोग्य तपासणी, मुलांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आणणार आहे.’’
धरण भरण्याची वाट पाहत होतो
विकासकामांवर आणि आश्वासनांवर होणा-या टीकांचा समाचार ठाकरे यांनी घेतला. ठाकरे म्हणाले, ‘‘शेतकरी कर्जमाफी ऐवजी कर्जमुक्ती देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. सत्तेचा आणि यंत्रणेचा गैरवापर केला जातोय, असा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे. बँक घोटाळा, सिंचनातील सत्तर हजार कोटी कोठे गेले याची चौकशी व्हायला नको? दंगल प्रकरण घडून गेल्यानंतर दहा वर्षांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केस उकरून काढली. त्यावेळी सत्तेचा दुरूपयोग नव्हता का? हे राजकारण नव्हते का?’’ दहा रूपयात जेवण या आम्ही दिलेल्या आश्वासनावर अजित पवारांनी टीका केली. पाच वर्षे काय केले? अशी टीका केली. पाच वर्षे दुष्काळ होता, धरण भरायची वाट पाहात होतो, या ठाकरे यांच्या वक्तव्यावर हशा पिकला.