विरह सहन झाला नाही; पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याने पतीकडून गाड्यांची तोडफोड
By नारायण बडगुजर | Updated: December 26, 2023 13:31 IST2023-12-26T13:28:25+5:302023-12-26T13:31:08+5:30
पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केल्यानंतर पतीने सोसायटीमधील गाड्या फोडल्या, दगड इकडे तिकडे मारून शिवीगाळ केली

विरह सहन झाला नाही; पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याने पतीकडून गाड्यांची तोडफोड
पिंपरी : पत्नीने घटस्फोटासाठीन्यायालयात अर्ज केल्याच्या कारणावरून पती सोसायटीच्या पार्किंगमधील गाड्या फोडू लागला. त्यावेळी त्याला अडवले असता त्याने तरुणाला मारहाण केली. तसेच तरुणाची आई व मित्राला शिवीगाळ करून धमकी दिली. काळेवाडीतील पाचपीर चौक येथील पंचनाथ काॅलनीत रविवारी (दि. २४) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
आशिष बालाजी पांचाळ (२२, रा. पंचनाथ काॅलनी, पाचपीर चौक, काळेवाडी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २५) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सदाशीव तुकाराम डिगे (५०, रा. भाटनगर, पिंपरी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांचाळ तसेच त्यांचे आईवडील व मित्र हे सोसायटीमधील पार्किंगमध्ये फिरत होते. त्यावेळी सोसायटीमधील राहणाऱ्या एका व्यक्तीचा नातेवाईक असलेल्या सदाशीव डिगे सोसायटीच्या पार्किंगमध्ये आला. डिगे याच्या पत्नीने घटस्फोटासाठीन्यायालयात अर्ज केला असल्याच्या कारणावरून डिगे हा सोसायटीमधील गाड्या फोडू लागला व दगड इकडे तिकडे मारून शिवीगाळ करू लागला. त्यामुळे फिर्यादी पांचाळ यांनी अडवले असता डिगे याने पांचाळ यांना हाताने मारहाण करून उजव्या हातास चावा घेऊन जखमी केले. तसेच पांचाळ यांचे आईवडील व मित्र भांडण सेाडवण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यवंशी तपास करीत आहेत.