दिघी परिसरातील विकास खोळंबला
By Admin | Updated: March 1, 2016 00:55 IST2016-03-01T00:55:26+5:302016-03-01T00:55:26+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिघी समाविष्ट होऊन २० वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. दिघीकरांना त्या वेळेस दाखवलेले विकासाचे स्वप्न मात्र स्वप्नच बनून आहे

दिघी परिसरातील विकास खोळंबला
दिघी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिघी समाविष्ट होऊन २० वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. दिघीकरांना त्या वेळेस दाखवलेले विकासाचे स्वप्न मात्र स्वप्नच बनून आहे. दिघी परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी स्वप्ने रंगवणाऱ्या मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे.
विधानसभा, महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना भरभरून मते देणाऱ्यांच्या वाटेला मात्र उपेक्षाच आली आहे. नागरी सुविधांची वानवा आहेच. शिवाय गटारे, रस्ते, शाळा, मैदाने, मंडई, पाणी, वीज या मूलभूत सुविधा फक्त कागदाशिवाय कोठेही दिसत नाहीत. वीस वर्षांत चार पंचवार्षिक निवडणुका झाल्या. मतांच्या पेट्या भरण्यासाठी निवडणूक काळात सभा झाल्या, विकासाची मोठी यादी वाचून, तर कधी रस्त्यावर नारळ फोडून विकासाचे गाजर दाखविण्याचे काम करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र दिघी परिसराचा विकास रखडलेला असल्याने नागरिकांतून आता संताप व्यक्त होत आहे. दिघीतील आरक्षणाचा न झालेला विकास हा प्रलंबित प्रश्न प्रामुख्याने विकासात अडथळा ठरत आहे. त्यामुळे नाराजीत आणखी भर पडत आहे.
दिघीतील एकूण ३७ आरक्षणांपैकी फक्त एकाचा विकास झाला आहे. एकमेव आरक्षणावर पाण्याची टाकी उभारली आहे. उरलेल्या आरक्षणात वाहनतळ २, उद्यान २, टेलिफोन सेंटर १, प्राथमिक शाळा ८, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी घरे १ , दफनभूमी १ , स्मशानभूमी १, सांस्कृतिक केंद्र व वाचनालय २ , दवाखाना व प्रसूतिगृह १ , टाऊन हॉल १, अग्निशमन केंद्र १, खेळाचे मैदान ३, जकात नाका १, पोलीस स्टेशन १, दुकान व मार्केट ४, माध्यमिक शाळा २, पंप हाऊस १ , बसस्थानक १, विद्युत उपकेंद्र १ ही सर्व आरक्षणे विकासाच्या प्रतीक्षेत असून त्यातील ९० टक्के आरक्षण अद्याप ताब्यातही घेतले गेले नाही.
४५ हजार लोकसंख्या असणाऱ्या या परिसरासाठी एकही उद्यान वा खेळाचे मैदान नाही. भोसरीतून दिघीला जाण्यासाठी डांबरीकरण झालेला एकच पक्का रस्ता आहे. तो म्हणजे भोसरीतील आळंदी रस्त्यावरून मॅगझिन चौकामार्गे असणारा रस्ता. दिघीकरांना वेढा मारून भोसरीत जाण्याची खर्चिक बाब ठरत आहे तर वेळसुद्धा वाया जात आहे. वास्तविक दिघीतून भोसरीकडे येण्यासाठी पर्यायी मार्ग आहेत. मात्र त्यांचे काम रखडलेले आहे.
आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास रुग्णाचे प्रचंड हाल होतात. उपचारासाठी भोसरीतील महापालिकेच्या रुग्णालयात किंवा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात धाव घ्यावी लागते. सुविधांयुक्त रुग्णालय होणे अपेक्षित होते. गटारी नसल्याने रस्त्यावर वाहणारा मैला, पुणे-आळंदी रस्त्याच्या बाजूला शंकर गाभारा मंदिराजवळ जमा होत आहे. परिसरात दुर्गंधी , डास, साथीचे रोग पसरत आहेत.
वारंवार तक्रार करूनही काम होत नसल्याचा राग दिघीकरांच्या मनात खदखदत आहे. दिघीचा महापालिकेत समावेश झाला. तेव्हा येथील जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत असणारी शाळा महापालिकेकडे वर्ग झाली. शाळेची इमारत असताना पालिकेने पुढाकार घेऊन आठवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय करणे अपेक्षित होते. याकडेसुद्धा डोळेझाक केल्यामुळे शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्याने पुढील शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. रस्त्यावर भाजी विक्रीस बसणारे, रस्त्यावर उभ्या असलेल्या हातगाड्या यामुळे सतत वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडी व भाजी विक्रेत्यांवर होणारी सततची कारवाई यामुळे भाजी मंडई चा विषय चव्हाट्यावर आला आहे. (वार्ताहर)