पिंपरी : महापालिका निवडणुकीत तिकीट वाटप करताना भाजपमध्ये मोठी कोंडी झाली. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला ‘एबी’ फॉर्म मिळणार, याबाबत ‘सस्पेन्स’ कायम राहिला. भाजपकडून उमेदवारी अंतिम होण्यास विलंब होत असतानाच शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी स्वतंत्रपणे काही प्रभागांत तगडे आणि प्रभावी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी लढती अधिक चुरशीच्या होण्याची चिन्हे आहेत.
भाजपमधील काही उमेदवारांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष तसेच भाजप शहराध्यक्षांकडून ग्रीन सिग्नल मिळूनही ऐनवेळी तिकीट देण्यात आले नाही. यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सर्वेक्षण आणि वरिष्ठांची सकारात्मक भूमिका असूनही डावलले गेलो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेनेकडेही काही उमेदवारांनी धाव घेतली.
भाजपमध्ये एका जागेसाठी तीन ते चारजण
भाजपमध्ये एका जागेसाठी तीन-चार इच्छुक असल्याने नेतृत्वासमोर समतोल साधण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, निर्णयप्रक्रियेतील गोंधळ, शेवटच्या क्षणी बदल आणि संवादाचा अभाव यामुळे नाराजी वाढल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी अपक्ष लढण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, भाजपमधून तिकीट न मिळालेल्या नाराज उमेदवारांची आज। बुधवारी (दि.३१) संयुक्त बैठक होणार असून, पुढील भूमिका ठरवली जाणार आहे. या बैठकीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
अपर्णा डोके भाजपमध्ये
राष्ट्रवादीच्या माजी महापौर अपर्णा डोके यांनी ऐनवेळी भाजपमधून अर्ज भरला आहे. त्या भाजपमध्ये जाणार असल्याची फक्त चर्चा होती. अखेर त्यांनी भाजपचा ‘एबी’ फॉर्म भरून अर्ज दाखल केला. शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या अश्विनी चिंचवडे यांना भाजपमधून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीतून (अजित पवार) अर्ज दाखल केला आहे. प्राधिकरणातील अमोल थोरात यांच्या पत्नी हर्षदा थोरात यांनाही उमेदवारी देण्यात आली नाही.
जगताप समर्थक शेखर चिंचवडे राष्ट्रवादीत
प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपला मोठा धक्का बसला. आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि २३ वर्षे भाजपसाठी कार्यरत असलेले शेखर चिंचवडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी (अजित पवार)मध्ये प्रवेश केला. चिंचवडे यांच्या पत्नी करुणा चिंचवडे यांनी २०१७ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवत सर्वाधिक मते मिळवली होती; मात्र आता दिलेले उमेदवारीचे आश्वासन पाळले नसल्याने नाराजी वाढली. भाजपमधील गटबाजी व कार्यकर्त्यांच्या उपेक्षेमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
कविता आल्हाट यांचा पत्ता कट
राष्ट्रवादीच्या (अजित पवार) शहराध्यक्ष कविता आल्हाट यांना पक्षाने शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीच्या (शरद पवार) महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश करत उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे.
Web Summary : BJP's ticket distribution for the PCMC election faces turmoil. Last-minute denials, despite assurances, spark outrage among loyalists. Many seek alternatives, joining rival parties, as internal discord and communication gaps fuel independent bids.
Web Summary : पीसीएमसी चुनाव के लिए बीजेपी के टिकट वितरण में उथल-पुथल। आश्वासनों के बावजूद अंतिम समय में टिकट न मिलने से निष्ठावानों में आक्रोश। आंतरिक कलह और संचार की कमी के कारण कई लोग विपक्षी दलों में शामिल हो रहे हैं।