पिंपरी : किवळे येथे मोकळ्या मैदानात ठेवलेल्या मंडप व सजावटीच्या साहित्याला शनिवारी (दि. २२) दुपारी आग लागली. यामध्ये मंडपाचे कापड, सजावटीचे साहित्य जळून खाक झाले. पिंपरी चिंचवड अग्निशमन मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी दोन तासांत ही आग आटोक्यात आणली.
मंडप व डेकोरेटर्सवाल्याने मोकळ्या मैदानात मंडपाचे साहित्य ठेवले होते. शनिवारी त्याला अचानक आग लागली. साहित्यामध्ये सजावटीसाठी वापरण्यात येणारी रेडीमेड फुले, फायबरच्या वस्तू तसेच कापड असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. स्थानिकांनी आग लागली असल्याची वर्दी पिंपरी-चिंचवड अग्निशमन मुख्यालयाला दिली.मुख्यालयातून चार बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बाजूने पाण्याचा मारा करत दोन तासांमध्ये कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशामक अधिकारी गौतम इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन अमित दिंबळे, नवनाथ शिंदे, विशाल फडतरे, मयूर कुंभार यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत लाखो रुपयांचे मंडप व सजावटीचे साहित्य जळून खाक झाले.