पिंपरी : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करत परराज्यात जाऊन तब्बल १०२ सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिस दलाचे विशेष कौतुक होत आहे. देशाच्या विविध भागांतून, तसेच रशियातूनही संशयितांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याची कामगिरी सायबर पोलिसांनी बजावली.
सायबर गुन्ह्यांवरील कठोर कारवाई
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, गुन्हेगार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना फसवत आहेत. बनावट शेअर मार्केट गुंतवणूक, बँकिंग फसवणूक, हॅकिंग, फिशिंग आणि सोशल मीडिया फसवणुकीसारख्या गुन्ह्यांवर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न
गुजरात, राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन सायबर पोलिसांनी संशयितांना अटक केली. विशेष म्हणजे, या धडक कारवाईदरम्यान पोलिसांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. जयपूर येथे संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या अंगावर संशयितानी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत आणि जिवावर उदार होऊन स्वामी यांच्या पथकाने संशयिताला अटक केली. या धाडसी कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांचे कौतुक होत आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गौरव
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या या अभूतपूर्व कामगिरीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. सायबर पोलिसांच्या कार्याची प्रशंसा केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पोलिस पथकाची मेहनत
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. तसेच, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, पोलिस अंमलदार हेमंत खरात, दीपक भोसले, सुभाष पाटील, विशाल निचीत, दीपक माने, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, सौरभ घाटे आणि महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या अथक परिश्रमामुळे हे यश मिळाले.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचा दबदबा
सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत असताना, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी देशभरात आपली छाप उमटवली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, वेळेचे भान आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर पथकाने वर्षभरात अभूतपूर्व कामगिरी केली. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिस दलाची प्रतिष्ठा उंचावली.