पिंपरी : चिखली, तळवडेसह शहराच्या विविध भागात कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात शुक्रवारी घोषणाबाजी केली. या प्रकरणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह ११ नगरसेवकांवर पोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे. विना परवाना जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. विनापरवाना बेकायदा जमाव जमवुन आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक दत्ता साने, मयुर कलाटे, समीर मासुळकर, जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका वैशाली काळभोर, गीता मंचरकर, सुलक्षणा शिलवंत, पौर्णिमा सोनवणे, अपर्णा डोके आदींचा समावेश आहे. महापालिकेतील सह शहर अभियंता आयुब पठाण यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक एकत्र आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. चिखली, तळवडेभागासह शहरात ठिकठिकाणी पाणी पुरवठा समस्या भेडसावत आहे. अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाकडून उपाययोजना का होत नाहीत, असा संतप्त सवाल आंदोलक नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या ११ नगरसेवकांविरूद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई केली. पिंपरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजी करणाऱ्या ११ आंदोलक नगरसेवकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 15:31 IST
महापालिकेतील सह शहर अभियंता आयुब पठाण यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक एकत्र आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजी करणाऱ्या ११ आंदोलक नगरसेवकांवर गुन्हा दाखल
ठळक मुद्देविनापरवाना जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध पोलिसांनी कारवाई महापालिका पाणीपुरवठा विभागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण