पिंपरी : क्रिकेटचे तिकीट ब्लॅक केल्याप्रकरणी तिघांना अटक केली. ही कारवाई ३१ जानेवारीला सायंकाळी सहाच्या सुमारास मामुर्डी येथे करण्यात आली. अर्जुन शशिकांत सप्पागुरू (२२, रा. देहूरोड), रवींद्र मनोहर बनसोडे (२७, रा. मामुर्डी, पुणे, मूळ रा. धाराशिव), राहुल राजू कानडे (२४, रा. देहूरोड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार सुनील शिरसाट यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी रोजी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी क्रिकेट सामना गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झाला. या मॅचसाठी दोन हजार ६४७ रुपये तिकीट होते. या दराची तिकिटे संशयितांनी खरेदी केली.
तीच तिकिटे त्यांनी ब्लॅकने सहा हजार रुपयांना विकली. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली असता पोलिसांनी तिघांना अटक केली.