Corona virus Pimpri : पिंपरीत 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश; एक लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 04:15 PM2021-04-10T16:15:33+5:302021-04-10T16:15:46+5:30

कोविड सेन्टरमधून मधून मिळवले होते इंजेक्शन्स

Corona virus Pimpri: Black market of 'Remdesivir' exposed in Pimpri; One lakh 74 thousand items confiscated | Corona virus Pimpri : पिंपरीत 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश; एक लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त 

Corona virus Pimpri : पिंपरीत 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश; एक लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त 

Next

पिंपरी : कोरोना आजारावरील रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना पकडले आहे. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीचे तीन रेमडेसीवीर इंजेक्शन, रोकड, असा एकूण एक लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग व अन्न सुरक्षा विभाग यांच्या पथकाने सांगवी येथे शुक्रवारी (दि. ९) ही कारवाई केली.

आदित्य दिगंबर मैदर्गी (वय २४, रा. पिंपरी), प्रताप सुनील जाधवर (वय २४, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ), अजय गुरुदेव मोराळे (वय २५, रा. सांगवी), मुरलीधर मुरलीधर मारुटकर (वय २४, रा. बाणेर), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे येथील अन्न व औषण प्रशासनाच्या औषध निरीक्षक भाग्यश्री अभिराम यादव यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे रेमडेसीवीर औषधाचा काळाबाजार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील काळूराम जगताप बॅडमिंटन हॉलसमोर शुक्रवारी दुपारी सापळा लावला. बनावट ग्राहकाद्वारे आरोपी आदित्य मैदर्गी याला फोन केला असता एका रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी ११ हजार यानुसार दोन इंजेक्शनसाठी २२ हजार रूपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. त्यानंतर आदित्य मैदर्गी इंजेक्शन विक्रीसाठी काटे पुरम चौकात आला असता त्याला ताब्यात घेतले. दोन इंजेक्शन त्याच्याकडून मिळून आले. प्रताप जाधवर याने रेमडेसीव्हीर दिले असल्याचे आरोपी मैदर्गी याने सांगितले. मैदर्गी याला विश्वासात घेऊन प्रताप जाधवर याला फोन करण्यास सांगितले. एकच इंजेक्शन शिल्लक असल्याचे जाधवरने सांगितले. ते इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन जाधवर काटेपुरम चौकात आला असता याला ताब्यात घेतले. आरोपी अजय मोराळे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार अजय मोराळे याला औंध येथील मेडीपॉईंट हॉस्पिटल येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे तीनही इंजेक्शन बाणेर कोविड सेंटर येथे ब्रदर म्हणून नोकरीस असलेल्या आरोपी मुरलीधर मारुटकर याच्याकडून घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार बाणेर येथून आरोपी मारुटकरलाही ताब्यात घेण्यात आले. 

आरोपींकडून ८० हजारांची दुचाकी, ६९ हजारांचे चार मोबाइल, १५ हजार रुपये किमतीचे तीन रेमडेसीवीर इंजेक्शन, १० हजार ४०० रुपये रोख, असा एक लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, मारुती करचुंडे, वैष्णवी गावडे, सोनाली माने व अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी भाग्यश्री यादव, विवेक खेडकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

कोविड सेंटरमधून मिळवले इंजेक्शन
आरोपी मारुटकर हा बाणेर येथील कोवीड सेंटरमध्ये ब्रदर म्हणून नोकरीस आहे. त्याने इतर आरोपींशी संगनमत करून कोविड सेंटरमधून रेमडेसीवीर इंजेक्शन अवैध मार्गाने मिळवून ते इतर आरोपींना दिले. तसेच त्या इंजेक्शनची छापील किमतीपेक्षा जास्त दराने ११ ते १५ हजारांना विक्री करताना आरोपी मिळून आले.

Web Title: Corona virus Pimpri: Black market of 'Remdesivir' exposed in Pimpri; One lakh 74 thousand items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.