Corona virus : तळेगाव दाभाडे येथे कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातून पळ काढल्यामुळे उडाली धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 02:09 IST2020-07-09T02:04:26+5:302020-07-09T02:09:41+5:30
डॉक्टर, कर्मचारी, आणि सुरक्षा रक्षकांची उडाली धांदल

Corona virus : तळेगाव दाभाडे येथे कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातून पळ काढल्यामुळे उडाली धावपळ
तळेगाव दाभाडे: येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड समर्पित रुग्णालयातून एका ४५ वर्षीय कोरोना बाधीत महिलेने बुधवारी सायंकाळी पलायन केले. त्यामुळे येथील डॉक्टर , कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची एकच धावपळ उडाली. सुमारे एक तासाच्या नाट्यमय घडामोडीनंतर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी पलायन केलेल्या महिलेस पकडले.
संबंधित महिला कामशेत मधील भीमनगर येथील असून तिच्यावर शुक्रवार(दि.३) पासून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून संबंधित महिलेने बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हॉस्पिटलमधील कठड्यावरून उडी मारली. सलायनच्या सुईसह मुख्य गेटमधून ती बाहेर पडली. नंतर महिलेने हातात दगड घेतले. तळेगाव स्टेशन भागातील मराठा क्रांती चौकाच्या दिशेने पलायन केले.सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना संबंधित महिलेस पकडण्यात यश आले.
संबंधित महिलेने पलायन केल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांशी तातडीने संपर्क साधला. संबंधित महिलेचे समुपदेशन करण्यात आले आहे.सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणे गरजेचे असल्याची नागरिकांची मागणी आहे.