रोजगाराला चालना देण्यासाठी समन्वय आवश्यक - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:50 IST2025-01-14T12:48:15+5:302025-01-14T12:50:44+5:30

या व्यासपीठामुळे महाराष्ट्रासह जगभरातील मराठी उद्योजकतेला चालना मिळेल.

Coordination is necessary to boost employment: Nitin Gadkari | रोजगाराला चालना देण्यासाठी समन्वय आवश्यक - नितीन गडकरी

रोजगाराला चालना देण्यासाठी समन्वय आवश्यक - नितीन गडकरी

पिंपरी : अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये मराठी उद्योजक मोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्रात नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. महाराष्ट्रासह देशभर उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराला चालना देण्यासाठी सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि उद्योजक यांच्यामध्ये योग्य समन्वय, संपर्क होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ, गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउंन्सिलच्या संयुक्त विद्यमाने, बालेवाडी येथे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पीसीयूचे कुलगुरू हर्षवर्धन पाटील, डॉ. रघुनाथ माशेलकर, लेखक संदीप वासलेकर, डॉ. समीर मित्रगोत्री, प्रा. डॉ. नील फिलिप, प्रा. डॉ. मुकुंद कर्वे, डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘पीसीईटी, पीसीयू, गर्जे मराठी ग्लोबल आणि एमईडीसी यांनी स्थापन केलेले ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ हे व्यासपीठ मार्गदर्शक ठरेल. या व्यासपीठामुळे महाराष्ट्रासह जगभरातील मराठी उद्योजकतेला चालना मिळेल.’

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्योजक रामदास काकडे, डॉ. पी. डी. पाटील आणि सुरेश पुराणिक यांना जीवनगौरव, तसेच आशिष आचलेकर, अमित गर्ग, डॉ. एस. व्ही. आंचन, रमेश रासकर, महेश भागवत यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सचिन ईटकर यांनी स्वागत केले. आनंद गानू यांनी आभार मानले.

स्वतंत्र विभाग निर्माण करणार
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “महाराष्ट्र बरोबरच देश-परदेशातील मराठी उद्योजकांना उद्योग, व्यवसायामध्ये मदत होण्यासाठी महाराष्ट्र उद्योग मंत्रालयाच्या वतीने एक स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात येणार आहे.”

Web Title: Coordination is necessary to boost employment: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.