व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेच्छा देणे पडले महागात ; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 13:31 IST2020-02-17T13:30:07+5:302020-02-17T13:31:17+5:30

एकतर्फी प्रेमातून तरुण तरुणीला प्रपाेज करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या विराेधात तरुणीने तक्रार दाखल केली आहे.

compliant against yoth for proposing girl on valentine day | व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेच्छा देणे पडले महागात ; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेच्छा देणे पडले महागात ; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : तरुणीच्या घरी जाऊन फुलांचा गुच्छ देऊन व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेच्छा देणे तरुणाला महागात पडले. तरुणीच्या आईशी त्याने वाद घातला. त्यामुळे तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली. चिखली येथे शुक्रवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला.

परेश पाखले (रा. आकुर्डीगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परेश पाखले हा फिर्यादी तरुणीचा दोन महिन्यांपासून पाठलाग करत होता. तरुणीच्या मैत्रिणीकडून नंबर मागून तरुणीशी जवळीक साधण्याचा तो प्रयत्न करीत होता. आरोपी परेश याने तरुणीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा देण्याचे ठरवले. त्यानुसार गिफ्ट घेऊन शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो तरुणीच्या घरी गेला. तरुणीने दरवाजा उघडल्यावर समोर आरोपी परेश दिसला. ‘तू इथे का आला’, असे तरुणीने विचारले. त्यामुळे आरोपी परेश याने गिफ्ट तरुणीच्या अंगावर फेकले. त्यावेळी तरुणीच्या आईने कोण आहे, असे विचारले. त्यामुळे परेश जिन्यातून खाली गेला. ‘परेश आला होता’, असे तरुणीने तिच्या आईला सांगितले. त्यावेळी तिची आई जिन्यातून खाली गेली. ‘निघ इथून’ असे आरोपी परेश याला म्हणून तरुणीची आई मोठ्याने ओरडली. त्यावेळी परेश त्यांच्या अंगावर धावून गेला. शिवीगाळ करत तरुणीकडे जात असताना जमा झालेल्या काही जणांनी त्याला बाहेर काढले. त्यानंतर तरुणीने पोलिसात धाव घेऊन तक्रार केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: compliant against yoth for proposing girl on valentine day