पिंपरी : इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या तरुणीने १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ताथवडे येथे ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, वर्गमित्र मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने तरुणीने आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार १२ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली.
सहिती रेड्डी (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (५४, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रणव राजेंद्र डोंगरे (२०, रा. आकुर्डी) याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहिती हिने ५ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास राहत्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, सहिती हिचे मित्र-मैत्रिणी फिर्यादी कलुगोटाला रेड्डी यांना भेटण्यासाठी आले. सहिती हिने मृत्युपूर्वी तिच्या मोबाईल वरून मैत्रिणीला मोबाईलचा पासवर्ड आणि सोसायटीमधील मित्राचा नंबर शेअर केला असल्याचे मैत्रिणीने सहितीच्या कुटुंबियांना सांगितले. त्यानुसार कुटुंबीयांनी सहितीचा मोबाईल फोन अनलॉक केला. त्यामध्ये सहितीने मित्र प्रणव, आई-वडील आणि सर्वांसाठी असे तीन व्हॉइस रेकॉर्डिंग करून ठेवले होते.
सहिती आणि तिचा वर्गमित्र प्रणव यांचे प्रेमसंबंध होते. सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन प्रणव हा तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी प्रणव डोंगरे याला अटक केली.