काय सांगता! सायबर भामट्यांचा पिंपरी-चिंचवडकरांना ११ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 10:14 AM2022-11-23T10:14:22+5:302022-11-23T10:17:39+5:30

ऑनलाइन फसवणूक प्रकरणात १५१ गुन्हे दाखल...

citizen faced 11 Crores online fraud cyber crime pcmc pune news | काय सांगता! सायबर भामट्यांचा पिंपरी-चिंचवडकरांना ११ कोटींचा गंडा

काय सांगता! सायबर भामट्यांचा पिंपरी-चिंचवडकरांना ११ कोटींचा गंडा

Next

पिंपरी : डिजिटल पेमेंटच्या युगात फसवणुकीची नवनवीन प्रकरणे दररोज समोर येत आहेत. सायबर चोर नवनवीन युक्त्या वापरून लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न करतात. फेक कॉलला बळी पडून अनेकजण ओटीपी, बॅंक खाते, एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती शेअर करतात. तसेच फसव्या लिंकवर क्लिक करतात आणि तेथेच सायबर चोरटे त्यांच्या खिशावर डल्ला मारतात. सायबर चोरट्यांनी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची ११ कोटी ९५ हजार ४३८ रुपयांची फसवणूक केली.

कधी क्रेडिट कार्डच्या नावे तर कधी डेबिट कार्डच्या एक्स्पायरी डेटच्या बहाण्याने चोर फसवणूक करतात. कधी केवायसी करण्याच्या बहाण्याने, तर कधी बँकेचे खाते अपडेट करण्याच्या नावाने लोकांच्या बॅंक खात्यातून पैसे काढून घेतात. यासोबतच लोन ॲपच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तसेच सेक्सटॉर्शन, वीजबिलाच्या नावाखालीही फसवणुकीच्या वेगवेगळ्या तक्रारी सायबर पोलिसांसह शहरातील पोलीस ठाण्यांकडे नागरिकांनी केल्या आहेत.

ॲपवरून फसवणुकीच्या २३५ तक्रारी

अनेकदा मोबाइलवर सायबर चोरटे तुम्हाला एक लिंक पाठवून त्या लिंकद्वारे ॲप डाऊनलोड करण्यास सांगतात. लोन ॲपसुद्धा डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. परंतु नागरिकांनी सतर्क राहून, कोणतेही अनोळखी ॲप डाऊनलोड करू नये. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत अनोळखी ॲपवरून फसवणूक झाल्याच्या २३५ तक्रारी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत.

तक्रार कोठे आणि कशी कराल?

ऑनलाइन फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा बॅंक खात्यांच्या ऑनलाइन सेवा बंद करण्याची विनंती अधिकृत हेल्पलाइन नंबरवर करावी. तसेच लागलीच सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच नजीकच्या पोलीस ठाण्यात देखील तक्रार करता येते. www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार करावी.

ऑनलाइन फसवणूक प्रकरणात १५१ गुन्हे दाखल

ऑनलाइन फसवणूक प्रकरणात १५१ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये सेक्सटॉर्शन, क्रेडिट, डेबिट कार्ड मुदत संपली आहे, अशा विविध माध्यमांतून फसवणूक करण्यात आली.

Web Title: citizen faced 11 Crores online fraud cyber crime pcmc pune news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.