चायनिज मांजाला पोलिसांची ढिल; वर्षभरात केली नाही एकही कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 05:24 PM2021-01-22T17:24:36+5:302021-01-22T17:25:08+5:30

बंदी असतानाही मांजा होतो उपलब्ध : माणसांसह पक्ष्यांनाही गमवावा लागतोय जीव

Chinese manja slackened by police; No action was taken during the year | चायनिज मांजाला पोलिसांची ढिल; वर्षभरात केली नाही एकही कारवाई

चायनिज मांजाला पोलिसांची ढिल; वर्षभरात केली नाही एकही कारवाई

Next
ठळक मुद्देशहरातील बाजारपेठेत ठोक तसेच किरकोळ विक्रेते

नारायण बडगुजर-
पिंपरी : नायलॉन तसेच चायनिज मांजामुळे गळा कापून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यात दुचाकीस्वारांची संख्या जास्त आहे. तसेच पक्षीही मांजात अडकून गतप्राण होण्याचे प्रकार नेहमीच घडतात. त्यामुळे अशा मांजाच्या वापरावर बंदी आहे. त्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिक विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. मात्र पिंपरी-चिंचवडपोलिसांनी वर्षभरात अशी एकही कारवाई केलेली नाही.

नाशिक फाटा येथे मांजाने गळा कापून २६ वर्षीय डॉक्टर तरुणीचा ऑक्टोबर २९१८ मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या वर्षी दापोडी येथे पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकीस्वाराच्या गळा मांजाने कापला होता. मात्र सतर्कतेमुळे दुचाकीस्वार बचावला. चायनिज नायलॉन मांजा शहरात येतो कुठून, असा प्रश्न पक्षीप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी पक्षीप्रेमींकडून वेळोवेळी करण्यात आली आहे. पतंग उडविण्याचा उत्सव देशभरात विविध सणांनिमित्त साजरा केला जातो. शहरात देशभरातील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे संबंधित नागरिक त्यांच्या परंपरेनुसार हा उत्सव साजरा करतात. परिणामी मकर संक्रांत तसेच बाराही महिने पतंग व मांजाला मागणी असते. त्यामुळे कधीही ते सहज उपलब्ध होते.

शहरातील बाजारपेठेत ठोक तसेच किरकोळ विक्रेते आहेत. बंदी असलेला चायनिज नायलॉन मांजा आम्ही विक्री करीत नाहीत, तसेच त्याची साठवणूक किंवा वाहतूक देखील करीत नाहीत, असे यातील काही विक्रेत्यांनी सांगितले.

नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होतात. काही पक्षी दगावतात. मकरसंक्रांतीच्या काळात हे प्रकार जास्त होतात. बंदी असतानाही मांजा मिळतो. याला आळा बसला पाहिजे. नागरिकांनी उत्सव साजरा करताना पक्षांच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले पाहिजे.
- योगेश कांजवणे, पक्षीप्रेमी, पिंपरीगाव

ठोस कारवाईची अपेक्षा
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत १५ पोलीस ठाणे आहेत. तसेच विविध विभाग व पथके नियुक्त करण्यात आली आहे. मात्र या पोलिसांना बंदी असलेला मांजा दिसून येत नाही का, पोलीस या प्रकाराकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी याबाबत ठोस कारवाई करून बंदी असलेल्या मांजाच्या विक्रीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Chinese manja slackened by police; No action was taken during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.