मेट्रोच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 15:31 IST2020-10-16T15:31:19+5:302020-10-16T15:31:51+5:30
वाहतुकीच्या बदलांची नोंद घेऊन वाहनचालकांनी सहकार्य करावे,पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून आवाहन

मेट्रोच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल
पिंपरी : मेट्रोच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. कीज हॉटेल, पिंपरी ते हॅरिस ब्रिज, दापोडी या दरम्यानची जुन्या महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सर्व्हिस रोडवर वळविण्यात येणार आहे. वाहतुकीच्या बदलांची नोंद घेऊन वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
पिंपरी येथील संत तुकारामनगर ते हॅरिस ब्रिज मेट्रो स्टेशनच्या वॉटर टँक, फुट ओव्हर ब्रिजचे फुटिंग, स्टेअर केस व लिफ्टचे काम केने जाणार आहे. संत तुकारामनगर ते हॅरिस ब्रिज दरम्यान मेट्रोचे कामकाज पूर्ण होईपर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत. किज हॉटेल, पिंपरी ते हॅरिस ब्रिज, दापोडी दरम्यान मेट्रोचे सकाळी 11 ते सायंकाळी 5 आणि रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत काम होणार आहे. त्यामुळे जुना पुणे - मुंबई महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सेवा रस्त्याने वळविण्यात येईल. या वेळेत वाहतूक संथ गतीने चालणार आहे. या वाहतूक बदलाबाबत मेट्रोचे कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.