पिंपरी : बुलढाणा जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द केले होते. फेरतपासणीत जात प्रमाणपत्र वैध ठरल्याने राज्य निवडणूक आयोगाने गायकवाड यांचे नगरसेवकपद कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिले आहेत. पिंपरी-चिंचवडपालिकेच्या निवडणुकीत गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक अ मधून अनुसूचित जाती या राखीव जागेतून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले. त्यांनी हिंदू-कैकाडी जातीचा दाखला दिला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन रोकडे यांनी गायकवाड यांच्या दाखल्यावर हरकत घेऊन बुलढाणा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. त्यानुसार समितीने गायकवाड याचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिला. त्याआधारे आयुक्त हर्डीकर यांनी गायकवाड याचे नगरसेवक पद रद्द केले. त्यामुळे मानधन व सभाभत्त्याच्या एकूण साडेचार लाख रुपये पालिकेकडे जमा करण्याचा सूचना नगरसचिव कार्यालयाने दिल्या होत्या. दरम्यान, गायकवाड यांनी समितीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. गायकवाड याचे जात प्रमाणपत्राची सहा महिन्यांच्या मुदत फेरतपासणीचे आदेश न्यायालयाने समितीला दिले होते. फेरतपासणीमध्ये समितीने जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला. मात्र, त्याचे नगरसेवक पद रद्दची कारवाई पालिकेने पूर्वीच केल्याने पालिका प्रशासनासमोर कोणता निर्णय घ्यायचा हा प्रश्न होता. याबाबत पालिकेने जात दाखला वैध ठरल्याचा निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी मार्गदर्शन मागितले होते. गायकवाड याचा जात दाखला वैध असल्याने नगरसेवकपद रद्दचे आदेश रद्द करून त्याचे नगरसेवकपद कायम ठेवण्यात यावे, असे निर्देश आयोगाचे सहसचिव राजाराम झेंडे यांनी दिले. त्यानुसार आयुक्तांनी गायकवाड यांचे नगरसेवक पद कायम ठेवण्याचे आदेश नगर सचिव कार्यालयास सोमवारी दिले आहेत.
पिंपरीत भाजपाचे कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 19:32 IST
पिंपरी-चिंचवडपालिकेच्या निवडणुकीत गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक अ मधून अनुसूचित जाती या राखीव जागेतून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले...
पिंपरीत भाजपाचे कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद कायम
ठळक मुद्देफेरतपासणीमध्ये समितीने जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय