बाईक बसखाली येऊनही सुदैवाने बचावले तरुणाचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 16:00 IST2018-03-03T16:00:09+5:302018-03-03T16:00:09+5:30
वेळ दुपारी अडीच वाजताची, पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक सुरळीत सुरू होती. चिंचवड मधील एम्पायर इस्टेट उड्डाणपूलाजवळ अचानक मोठा आवाज झाला.

बाईक बसखाली येऊनही सुदैवाने बचावले तरुणाचे प्राण
चिंचवड - वेळ दुपारी अडीच वाजताची, पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक सुरळीत सुरू होती. चिंचवड मधील एम्पायर इस्टेट उड्डाणपूलाजवळ अचानक मोठा आवाज झाला. रस्त्यावर धावणारी बस लागलीच थांबली. परंतु या बसच्या मागील चाकाखाली अडकलेली दुचाकी पाहून नागरिक बस कडे धावले. मात्र दैव बलवत्तर असल्याने दुचाकीवरील तरुण रस्त्यावर पडला आणि या गंभीर अपघातात त्याचे प्राण वाचले.
एका खाजगी कंपनीची बस (एमएच १४ बी ए ८३५४) पिंपरीकडून चिंचवड स्टेशनकडे जात असताना बस व दुचाकी(एम एच १४ एफ व्ही ६०८०) यांच्यात धडक झाली.या धडकेत दुचाकी बसच्या मागील भागात अडकली. मात्र या घटनेत दुचाकी स्वार रस्त्यावर पडल्याने त्याचे प्राण वाचले. या वेळी या महामार्गावर इतर वाहनांचीही मोठी वर्दळ होती.या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णाल्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या आपघाता मुळे या मार्गावर मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. अपघाताच्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल न झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. या भागातील नगरसेवक शैलेश मोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक सुरळीत केली. हा अपघात मोबाईल मुळे झाल्याची चर्चा परीसरातील नागरिक करत होते. दुचाकी चालक गाडी चालत असताना मोबाईल वर बोलत असल्याने त्याला मागून येणाऱ्या बसचा अंदाज आला नाही. यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शी करत होते. मोठा अपघात होऊनही सुदैवाने या तरुणाने प्राण वाचल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.