पिंपरी : शहरातील मेट्रो स्थानक परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांचा विळखा वाहतूक पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे वाढत आहे. पीसीएमसी, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी स्थानकाबाहेर रिक्षाचालक अनधिकृत थांबे करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून, प्रवाशांचे हाल होत आहेत.
मेट्रो स्टेशनजवळ वर्दळीच्या वेळीच वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन मोबाइलमध्ये व्यस्त असतात किंवा बघ्याच्या भूमिकेत असतात. “पोलिस चौकात उभे असतात; पण रिक्षाचालकांवर कारवाई करत नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करतात. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालक निर्ढावले आहेत.
बेशिस्त रिक्षांमुळे वाहतूक कोंडी
मुख्य रस्त्यांवर अनधिकृत थांबे असल्याने बस आणि खासगी वाहनांना अडथळा होतो. सकाळी व संध्याकाळी वर्दळीच्या वेळी, तसेच सणासुदीच्या काळात ही समस्या अधिक वाढते.
पिंपरी मेट्रो स्थानकाबाहेर परिस्थिती गंभीर
शहरातील पहिले व महत्त्वाचे मेट्रो स्थानक असलेल्या पिंपरी (पीसीएमसी) मेट्रो स्थानकाबाहेर परिस्थिती गंभीर बनली आहे. येथे ‘नो-पार्किंग’चे फलक असतानाही निगडी व मोरवाडीच्या दिशेला पदपथावरच जिन्याच्या जवळच रिक्षा थांबवल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होतो. तसेच महामार्गावरून जाणारे रिक्षाचालक प्रवाशांना पाहून महामार्गावर रिक्षा थांबवतात. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडले.
प्रवाशांवर दादागिरी
प्रवासी मेट्रो स्थानकातून महामार्गावर आल्यावर त्याला रिक्षात बसण्यासाठी दादागिरी केली जाते. नवीन प्रवासी दिसल्यास त्याला अवाच्या सव्वा भाडे आकारले जाते. अनेकदा प्रवाशांना हाताला धरून जबरदस्तीने रिक्षात बसविण्याचे प्रकार घडत आहेत.
तीन महिन्यांत १७६२ रिक्षांवर कारवाई
पिंपरी वाहतूक पोलिस विभागाने जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या १,७६२ रिक्षांवर कारवाई केली आहे. यानुसार वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या सरासरी २० रिक्षांवर दिवसभरात कारवाई करण्यात आली. मात्र, फक्त मोरवाडी येथे पीसीएमसी स्थानकाजवळच एकावेळी २० पेक्षा अधिक रिक्षा ‘नो-पार्किंग’मध्ये थांबत असल्याचे दिसून येते.
मागील तीन महिन्यांत १,७६२ रिक्षांवर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नियमभंग करण्याऱ्या रिक्षा जागेअभावी जप्त करण्यात येत नाहीत. - वर्षाराणी पाटील, पोलिस निरीक्षक, पिंपरी वाहतूक विभाग
बेशिस्त रिक्षाचालकांवर कोणाचाही नियंत्रण नाही. त्यामुळे त्यांचा बेशिस्तपणा वाढला आहे. पिंपरी मेट्रो स्थानकाजवळ पोलिस असून, रिक्षांवर कारवाई होत नाही. - संगीता चव्हाण, प्रवासी