उद्योजक, उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर थेट ‘मोका’ लावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांना सूचना
By नारायण बडगुजर | Updated: February 6, 2025 17:25 IST2025-02-06T17:24:53+5:302025-02-06T17:25:33+5:30
आम्हाला ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास दिला जात आहे, वसुली केली जात आहे, अशा तक्रारी उद्योग क्षेत्रातून, उद्योजकांकडून आमच्याकडे येत आहे

उद्योजक, उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर थेट ‘मोका’ लावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांना सूचना
नारायण बडगुजर
पिंपरी : आम्हाला ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास दिला जात आहे, वसुली केली जात आहे, अशा तक्रारी उद्योग क्षेत्रातून, उद्योजकांकडून आमच्याकडे येत आहेत. मात्र, हे खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांनीही खपवून घेऊ नये. उद्योजकांना त्रास देणारा महायुती किंवा इतर कोणत्याही पक्षाचे असूद्या, त्यांना सोडू नका. त्यांच्यावर थेट ‘मोका’ लावा. त्यांच्यावर ‘मोका’च्या खालची कारवाई करू नका, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिली.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यालयाच्या इमारतीचे गुरुवारी (दि. ६) जाधववाडी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भुमीपूजन झाले. यावेळी फडणवीस बोलत होते. महाळुंगे ओद्योगिक पोलिस संकुल, देहूरोड येथील पोलिस विश्रामगृह तसेच पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यालयाच्या इमारतीचेही ऑनलाइन भुमीपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्य मंत्री योगेश कदम, आमदार अमित गोरखे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, शंकर जगताप, विजय शिवतारे, सुनील शेळके, शरद सोनवणे, बाबाजी काळे, बापू पठारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त डाॅ. योगेश म्हसे, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, शिवाजी पवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड परिसरात मोठा औद्योगिक भाग असल्याने स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची गरज निर्माण झाली. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय तयार केले. मात्र, अधूनमधून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्रातून आमच्याकडे तक्रार येते. आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केले जातेय, आमच्याकडून वसुली केली जातेय, अशा तक्रारी हे गुंतवणूकदार, उद्योजक करतात. काहीही झाले तरी हे खपवून घेतले जाणार नाही. मी पोलिस आयुक्त चौबे यांना आज ऑथराइज करत आहे. काही राजकीय पक्षाचे लोक हे प्रकार करत असतील. कुठल्याची पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलीही तडजोड करायची नाही. उद्योजकांना कोणी त्रास देत असेल तर त्यांच्यावर मोकाची कारवाई करायची. ‘मोका’च्या खालची कारवाई करायचीच नाही. काहीही झाले तरी महाराष्ट्रामध्ये उद्योगांना त्रास होता कामा नये.