हिंजवडी : अनेकदा पत्रव्यवहार करून, विनंती करून आणि विविध समाज माध्यमांवर व्यक्त होऊन देखील पालकमंत्री अजितदादा पवार ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ देत नाही. दुसरीकडे प्रशासनाकडून प्रस्तावीत रस्ता रुंदीकरण प्रक्रिया मात्र जोमात सुरु आहे. त्यामुळे, हिंजवडीच्या उपसरपंच दीपाली जांभुळकर यांनी थेट ग्रामदैवत 'म्हातोबा'ला साकडं घातलं आहे. अजितदादांना सद्बुद्धी मिळो आणि किमान गावठाण हद्दीतील रस्ता रुंदीकरण बाबत ग्रामस्थांचे म्हणणे ऐकायला वेळ मिळो अशा भावना उपसरपंच जांभुळकर यांनी म्हातोबा देवापुढे व्यक्त केल्या.
दरम्यान, रविवार (दि.३) रोजी सकाळी दहा वाजता हिंजवडीच्या उपसरपंच दीपाली शरद जांभुळकर यांनी निवडक ग्रामस्थां समवेत ग्रामदैवत म्हातोबा मंदिरात जाऊन विशेष अभिषेक केला. पीएमआरडीए कडून सध्या आयटीपार्कला जोडणाऱ्या सर्व प्रमुख मार्गावर रुंदीकरण करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी ३६ मिटर अंतरावर सीमांकन करून कारवाई सुरु आहे.
सगळीकडे, स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आहे. मात्र, गावठाण रस्त्याबाबत ग्रामस्थांची वेगळी भूमिका आहे. याबद्दल पालकमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी - माण - मारुंजी ग्रामस्थांना वेळ द्यावा, त्यांचे म्हणणे सुद्धा एकदा ऐकून घ्यावे अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. याकडे, लक्ष वेधण्यासाठी हिंजवडीच्या उपसरपंच दीपाली जांभुळकर यांनी थेट ग्रामदैवत श्री. म्हातोबा देवाला अभिषेक करत, साकडं घातल आहे.
प्रस्तावीत ३६ मिटर अंतर कायम ठेवल्यास गावठाण रस्त्यावर असणारी विविध मंदिरे, स्मशानभूमी, दशक्रिया विधी घाट, होळीचा पायथा, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय तसेच पाच दशकाहून अधिक वास्तव्य करणारी घरे याठिकाणी बाधित होत आहे. त्यामुळे, किमान गावठाण रस्त्याबाबत ग्रामस्थांचे म्हणणे पालकमंत्री यांनी एकदा व्यवस्थित ऐकून घ्यावे. - दीपाली शरद जांभुळकर : उपसरपंच, हिंजवडी