अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, खयाल रखना; त्याचा शेवटचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:43 IST2025-06-14T10:42:14+5:302025-06-14T10:43:33+5:30

Ahmedabad Air India Plane Crash: ‘‘अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..!’’ असे फोनवर सांगत तो विमानात बसला आणि काही वेळातच त्याचे विमान कोसळले. बावीस वर्षांच्या तरण्याबांड देहाचा कोळसा झाला...

Air India Plane Crash: Ammi, Main London Ja Raha Hoon, Khayal Rakhana; His last call | अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, खयाल रखना; त्याचा शेवटचा फोन

अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, खयाल रखना; त्याचा शेवटचा फोन

- जमीर सय्यद
नेहरूनगर (पिंपरी, जि. पुणे) : ‘‘अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..!’’ असे फोनवर सांगत तो विमानात बसला आणि काही वेळातच त्याचे विमान कोसळले. बावीस वर्षांच्या तरण्याबांड देहाचा कोळसा झाला... पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर येथील इरफान समीर शेखची ही दर्दभरी दास्तान. एअर इंडियात क्रू मेंबर असलेल्या इरफानचा अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत मृत्यू झाला अन् अवघे शहर सुन्न झाले.

आईला करायचा फोन 
इरफान नेहमी विमानात बसण्यापूर्वी आईला फोन करून कळवत असे. गुरुवारच्या दुर्घटनेनंतर वृत्तवाहिन्यांवर बातम्या पाहताना आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.  

पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, जयहिंद महाविद्यालयात झाले शिक्षण 
इरफानने अम्मी-अब्बू-भय्यासोबत आठवडाभरापूर्वी साजरी केलेली बकरी ईद शेवटचीच ठरली. इरफान शेख एअर इंडिया कंपनीत कॅबिन क्रू म्हणून दोन वर्षांपासून कार्यरत होता. संत तुकारामनगर परिसरातील डॉ. डी. वाय. पाटील स्कूलमध्ये तो दहावीपर्यंत, तर पिंपरीतील जयहिंद महाविद्यालयात बारावीपर्यंत शिकला. मनमिळाऊ स्वभावाच्या उमद्या तरुणाच्या मृत्यूने शोककळा पसरली.
मुंबईमध्ये हवाई वाहतुकीतील तंत्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून इरफान आधी विस्तारा कंपनीत आणि त्यानंतर एअर इंडियात दाखल झाला होता.  त्याचे वडील समीर नूरमहंमद शेख यांचा पराठ्याचा व्यवसाय आहे. तर आई तसलीम गृहिणी आहेत. मोठा भाऊ अमीर सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात नोकरीस आहे.

इरफान सुटीवर आला की मला भेटायचा यायचा. ईददिवशीच आम्ही भेटलो होतो. गप्पा मारल्या. सोबत जेवणही केले. ती ईद त्याच्यासोबतची शेवटची ठरली. त्याच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- फिरोज शेख, चुलते, संत तुकारामनगर

आठ दिवसांपूर्वी होता घरी
बकरी ईद साजरी करण्यासाठी सुटी घेऊन इरफान आठ दिवसांपूर्वी घरी आला होता. ईद साजरी करून ९ जून रोजी मुंबई येथे कामावर गेला. गुरुवारी (१२ जून) अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानात क्रू मेंबर म्हणून त्याची ड्यूटी होती. विमानात जाण्यापूर्वी आईला फोन करून त्याने निरोप दिला आणि काही वेळातच काळाने घात केला.
एअर इंडियाकडून घरी कळविण्यात आले. आई-वडील, मोठा भाऊ तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले.शुक्रवारी सकाळी त्याच्या चुलत्यांकडून ही बातमी परिसरात समजली. 

 

Web Title: Air India Plane Crash: Ammi, Main London Ja Raha Hoon, Khayal Rakhana; His last call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.