पिंपरी : महापालिकेच्या सारथी पोर्टलसह इतर माध्यमांतून आलेल्या तक्रारींची सोडवणूक वेळेत करायला हवी. कोणत्याही तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत, याची सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी दिला.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या बैठकीत सारथी पोर्टल, आपले सरकार, पीजी पोर्टल, सीएमओ पोर्टल अशा विविध तक्रार निवारण प्रणालींबाबत चर्चा झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, उपआयुक्त विठ्ठल जोशी, अविनाश शिंदे उपस्थित होते. प्रश्न जलद सोडविण्याची गरजआयुक्त शेखर सिंह म्हणाले, सारथी पोर्टलवर नागरिक महापालिकेशी संबंधित तक्रारी नोंदवित असतात. नागरिकांचे प्रश्न जलद सोडविणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना त्या सुविधांविषयी नागरिकांचे मत काय आहे, याकडे महापालिका प्रशासनाने सातत्याने लक्ष दिले पाहिजे. त्यातून नागरी समाधानाचा निर्देशांक वाढण्यासाठी मदत होत असते. सेवा सुविधांबद्दल नागरिक तक्रारी नोंदवित असतात. त्यावेळी संबंधित विभागाने तक्रारींचा प्राधान्यक्रम ठरवून त्यांचे वेळेत सोडवायला हव्यात. त्याची नोंद ठेवायला हवी. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी तक्रारींची सोडविण्यावर भर द्यावा.
'सारथी पोर्टलवरील तक्रारींची दखल न घेतल्यास कारवाई' शेखर सिंह यांचा इशारा : तक्रारी वेळेत सोडविण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 14:34 IST