शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार आरोपीला अटक; पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 19:30 IST2021-06-16T19:29:12+5:302021-06-16T19:30:01+5:30
आरोपी मच्छिंद्र वरकटे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार आरोपीला अटक; पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे जप्त
पिंपरी : शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार आरोपीला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केले आहे. पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी (दि. १५) रात्री घोलप कॉलेज जवळ, सांगवी येथे ही कारवाई केली.
मच्छिंद्र हरिकिसन वरकटे (वय ३२, रा. इंद्रपरी कॉलनी, तळेगाव दाभाडे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी शैलेश मगर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मच्छिंद्र वरकटे याला पिंपरी-चिंचवडपोलिसांनी ३१ ऑक्टोबर २०२० रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. असे असताना देखील तो महाराष्ट्र शासनाची अथवा पोलीस आयुक्तांची परवानगी न घेता शहरात आला. आरोपी सांगवी येथील घोलप कॉलेज जवळ आला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी मच्छिंद्र वरखडे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार ६०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आली. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील तपास करीत आहेत.