Pimpri Chinchwad: दारू पिताना शिवीगाळ, रागातून केला मित्राचा खून; मृतदेह नाल्यात फेकला
By नारायण बडगुजर | Updated: October 17, 2023 20:30 IST2023-10-17T20:30:23+5:302023-10-17T20:30:47+5:30
पुरवणी जबाबामुळे प्रकरण उघडकीस...

Pimpri Chinchwad: दारू पिताना शिवीगाळ, रागातून केला मित्राचा खून; मृतदेह नाल्यात फेकला
पिंपरी : दारु पिताना शिवीगाळ केल्याच्या रागातून दोन मित्रांनी तिसऱ्या जिवलग मित्राचा चाकूने वार करत खून केला. त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला. मित्राच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार देताच दोघे मित्र पळून गेले. पोलिसांनी तपास करत दोघांना अटक केली.
पंकज रतन पाचपिंडे (२८, रा. थेरगाव), अमरदीप उर्फ लखन दशरथ जोगदंड (३३, रा. थेरगाव गावठाण. मूळ रा. अंबाजोगाई, परळी, जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुरज उर्फ जंजीर कांबळे (३०, रा. थेरगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे.
पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज कांबळे बेपत्ता झाल्याबाबत ७ ऑक्टोबर रोजी त्यांची पत्नी आरती यांनी तक्रार केली. दरम्यान ११ ऑक्टोबरला आरती यांनी पुरवणी जबाब दिला. त्यामध्ये पती सुरज हा त्यांचा मित्र पंकज आणि अमरदीप यांच्यासोबत दारू पिण्यासाठी गेला. त्यानंतर तो घरी आला नसल्याचे सांगितले. दरम्यान, पंकज आणि अमरदीप देखील कोठेतरी निघून गेले असल्याचे समोर आले. त्यामुळे या दोघांवर पोलिसांचा संशय बळावला. वाकड पोलिसांनी अंबाजोगाई येथून दोघांना ताब्यात घेतले. ५ ऑक्टोबरला पंकज पाचपिंडे यांच्या घरात दारू पिण्यासाठी बसलो होतो. त्यावेळी सुरज कांबळे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्या रागातून चाकूने सुरजच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला, असे पंकज आणि अमरदीप यांनी पोलिसांना सांगितले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहाय्यक फौजदार बाबाजान इनामदार, अंमलदार संदीप गवारी, स्वप्नील खेतले, दीपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबिले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडित यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पुरवणी जबाबामुळे प्रकरण उघडकीस
सुरजचा मृतदेह गोधडीत गुंडाळून टेम्पोमधून बावधन येथे नेला. गायकवाड वस्ती येथील नाल्यामध्ये सुरजचा मृतदेह टाकून दिला. त्यानंतर ते दोघे दोन दिवस काहीच घडले नाही अशा अविर्भावात राहिले. सुरज हा शेवटच्या दिवशी कोणाकडे गेला होता याची माहिती मिळाल्याने आरती यांनी पुरवणी जबाब दिला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.