भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, म्हाळुंगेतील घटना
By नारायण बडगुजर | Updated: December 1, 2023 17:40 IST2023-12-01T17:39:58+5:302023-12-01T17:40:33+5:30
याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे...

भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, म्हाळुंगेतील घटना
पिंपरी : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे गुरुवारी (दि. ३०) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. प्रमिला उर्फ संगीता चांगदेव ठाकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. बाळू भाऊ भोसले (६८, रा. माणगाव, ता. मुळशी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले आणि प्रमिला ठाकर हे दोघेजण गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास म्हाळुंगे गावातून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने भोसले यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये प्रमिला दुचाकीवरून खाली पडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर भोसले हे देखील गंभीर जखमी झाले. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे तपास करीत आहेत.