शिरगाव : भरधाव वेगातील टेम्पोचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारीवर पलटी झाला. ही घटना सोमाटणे फाटा (ता. मावळ) येथील बैलजोडी चौकात घडली. अपघातात मोटारचालक थोडक्यात बचावले असून मोटारीचे मोठे नुकसान झाले.
शिरगावहून सोमाटणेच्या दिशेने वेगात येत असलेला सिमेंट विटांनी भरलेला टेम्पो (एमएच- ४२, बीएफ- ९२७७) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला खांबाला धडकला. त्यानंतर पुढे चौधरी हार्डवेअर या दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारीवर पलटी झाला. दीपक कुमार (४०) असे टेम्पोचालकाचे नाव आहे. तर शैलेंद्र सिंग (५८, रा. भांगरवाडी, लोणावळा) असे अपघातात जखमी झालेल्या मोटारचालकाचे नाव आहे. येथील दुकानचालक जीवन चौधरी आणि ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवून शैलेंद्र सिंग यांना मोटारीची काच फोडून बाहेर काढल्याने ते थोडक्यात बचावले.
अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, टेम्पोचालक दारूच्या नशेत होता का? याचा तपास तळेगाव पोलिस करत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अशोक कोकाटे यांनी दिली. अधिकचा तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.