'बिबट्या आला रे...', रावेत-किवळे परिसरात ती अफवाच..!
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 4, 2025 15:48 IST2025-01-04T15:48:34+5:302025-01-04T15:48:34+5:30
या परिसरात बिबट्या आढळला नसून ही पोस्ट अफवा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

'बिबट्या आला रे...', रावेत-किवळे परिसरात ती अफवाच..!
पिंपरी : रावेत- किवळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याबाबत एक व्हॉट्सअॅप पोस्ट मोठया प्रमाणात व्हायरल झली आहे. या पोस्टमध्ये रावेत भागातील कोहिनूर ग्रॅंड्युर, फेलिसिटी आणि सिल्वर ग्रेशिया सोसायटीच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. पण, ही निव्वळ अफवा असल्याचे समोर आले आहे. मात्र, या एका व्हॉट्सॲप पोस्टमुळे नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली. या परिसरात बिबट्या आढळला नसून ही पोस्ट अफवा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
लहान मुलांना तर गावकरी रात्रंदिवस घरातच डांबून ठेवू लागले आहेत. याला कारण ठरली आहे ती सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक पोस्ट. रावेत भागात बिबट्याचा वावर असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. ‘कोहिनूर ग्रॅंड्युर, फेलिसिटी आणि सिल्वर ग्रेशिया सोसायटीच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी’ असे या पोस्टमधून सांगण्यात आले आहे. बिबट्याच्या या अफवेमुळे नागरिक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. गावात रात्री कोणीही घराबाहेर पडायला तयार नव्हते. रात्रीच काय तर भर दिवसाही घराबाहेर पडायला नागरिक घाबरत आहेत.
रावेत परिसरात बिबट्या आलेला नाही. बिबट्याच्या पायांची ठसे किंवा त्यांसंदर्भात कोणताही पुरावा आढळला नाही. मात्र, बिबट्या येईल की नाही, याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. - रितेश साठे, स्केल्स ॲण्ड टेल्स ॲनिमल रेस्क्यू फाउंडेशन
या व्हायरल पोस्ट संदर्भात माहिती घेतली असता ही निव्वळ अफवा आहे. अशी खोटी पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- मनोज बारबोले, वनक्षेत्र अधिकारी, वनविभाग