साफसफाई करणाऱ्या महिलेचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: December 12, 2025 00:32 IST2025-12-12T00:32:20+5:302025-12-12T00:32:20+5:30
पाहणी करत असताना सुरक्षा रक्षकांना महिला पाण्यात पडलेली सापडली.

साफसफाई करणाऱ्या महिलेचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
नारायण बडगुजरपिंपरी : भूमिगत पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना डुडुळगाव येथील वहिलेनगर येथे गुरुवारी (दि. ११ डिसेंबर) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
आशाबाई ढोणे (वय ४५, रा. वहिलेनगर, डुडुळगाव) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ढोणे या यशदा स्प्लेंडर पार्क येथील इमारतीत साफसफाईचे काम करण्यासाठी यायच्या. गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे साफसफाईचे काम करीत असताना त्या पाण्याच्या टाकीत पडल्या. काही वेळाने सुरक्षारक्षक परिसरात पाहणी करीत असताना ढोणे या पाण्यात पडल्याचे समोर आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला याबाबत तात्काळ माहिती देण्यात आली. याबाबत माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आशाबाई ढोणे यांना पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात त्यांना तात्काळ दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.