पिंपरी महापालिका शाळांचे ५३ टक्के विद्यार्थी ऑनलाइन तर ४७ टक्के ऑफलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 10:01 PM2021-06-29T22:01:35+5:302021-06-29T22:01:50+5:30
शहरात महापालिकेच्या पहिली ते आठवीच्या एकूण १०५ शाळा आहेत. त्यामध्ये सद्य:स्थितीत ३१,८८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
पिंपरी : कोरोनामुळे यंदाचेही शैक्षणिक वर्ष ऑनलाइन सुरू झाले. सध्या महापालिका शाळेतील ५३ टक्के विद्यार्थीऑनलाइन शिक्षण घेत आहेत, तर ४७ टक्के विद्यार्थी ऑफलाइन शिक्षण घेत आहेत, अशी माहिती महापालिका शिक्षण विभागाने दिली.
ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून स्वाध्याय स्वरूपातील अभ्यासक्रम घरी पाठविला जात आहे. तसेच आठवड्यातून एका अभ्यासक्रमावर आधारीत चाचणी सोडवून घेतली जात आहे.
शहरात महापालिकेच्या पहिली ते आठवीच्या एकूण १०५ शाळा आहेत. त्यामध्ये सद्य:स्थितीत ३१,८८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून ऑनलाइन शाळा सुरू आहेत. परंतु महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना अडचणींना सामना करावा लागत आहे. तसेच यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यंदा शहरात १४६७ शालाबाह्य विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. शालाबाह्य विद्यार्थी ठरवताना एक महिना शाळेत गैरहजर असलेले आणि सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ गैरहजर असलेले विद्यार्थी, असे दोन भाग करण्यात आले. तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन उपस्थित नसलेले आणि ज्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशा विद्यार्थ्यांना शालाबाह्य ठरविण्यात आले आहे.
---
माध्यम एकूण विद्यार्थी ऑनलाइन ऑफलाइन
मराठी २६,५३४ १३,६२८ १२,९०१
इंग्रजी १०२४ ७४३ २८१
उर्दू ३५३९ २२१७ १३२२
हिंदी ७८३ ३२५ ४५८
एकूण : ३१,८८० १६,९१३ १४,९६७
--