"मम्मी मी विष प्यायलो, मला मरायचे आहे"; व्हिडिओ, ऑडिओ करून १८ वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल, 'ते' विषारी औषध ऑनलाइन मागवले
By नारायण बडगुजर | Updated: June 22, 2025 22:32 IST2025-06-22T22:31:38+5:302025-06-22T22:32:39+5:30
मावळ तालुक्यातील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी तरुणाचा मृतदेह आढळला.

"मम्मी मी विष प्यायलो, मला मरायचे आहे"; व्हिडिओ, ऑडिओ करून १८ वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल, 'ते' विषारी औषध ऑनलाइन मागवले
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : "मम्मी, मला मरायचे आहे, मी विष प्यायलो आहे, मी मोबाईल फोडून टाकतो. पुरावा राहणार नाही, मी लोकेशन पाठवले आहे. माझा मृतदेह घेऊन जा..." अशा आशयाची सुसाईड ऑडिओ आणि व्हिडिओ आईला पाठवून १८ वर्षीय तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली आहे. मावळ तालुक्यातील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी तरुणाचा मृतदेह आढळला.
संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय १८, रा. काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयकुमार यांचे आईवडील आणि दोन बहिणी काळेवाडी येथे राहतात. संजयकुमार हा देहूरोड येथील विकासनगर येथे बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. मात्र, घरी परत आला नाही. त्यामुळे १७ जून रोजी देहूरोड पोलिस ठाण्यात संजयकुमार बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. अखेर शनिवारी (२१ जून ) त्याचा मृतदेह घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी आढळून आला. मृतदेहाच्या जवळ विषारी औषधाची बाटली आढळली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये बहिणींची चिंता व्यक्त केली असून त्यांना उच्चशिक्षित करा अशी विनंती आई -वडिलांना केली आहे. संजयकुमारने विषारी औषध हे ऑनलाइन मागवले होते. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या ऑडिओमध्ये विषारी औषध प्यायल्याचे त्याने आईला सांगितले. ऑडीओ आणि व्हिडिओ असे दोन क्लिप पोलिसांना मिळून आल्या आहेत.
संजयकुमार व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाला आहे?
"ज्या प्रमाणे इतर लोक मरतात तसा मी ही मरेल... आणखी काही बोलायचे नाही... माझ्या आईवडिलांना एवढेच सांगायचे आहे की, माझ्या बहिणींना कुणी त्रास देऊ नका. मला काही नकोय... केवळ माझ्या बहिणींची चिंता आहे. याव्यतिरिक्त या जगात कुणाची चिंता नाही. दोन्ही बहिणींची चिंता आहे. त्यांना काही झालं नाही पाहिजे. त्यांचे पालनपोषण चांगले व्हायला हवे."