कमी बजेटमध्ये परदेशात फिरायचंय? मग 'हे' देश ठरू शकतात उत्तम पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 09:37 AM2024-02-22T09:37:58+5:302024-02-22T09:49:35+5:30

travel : तुम्ही परदेश वारीत कमी बजेटमधील काही देशातील पर्यटनस्थळे पाहू शकता

मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या की, अनेकांना फिरायला जाण्याचे वेध लागतात. यातच अनेकांना परदेशात फिरायला जायला आवडते. त्यामुळे तुम्ही परदेश वारीत कमी बजेटमधील काही देशातील पर्यटनस्थळे पाहू शकता. आम्ही तुम्हाला अशी काही पर्यटनस्थळे सांगणार आहोत, जिथे तुम्ही स्वस्तात मस्त फिरु शकता.

भारताच्या सीमेलगत असणारा देश नेपाळ. कमी वेळ आणि कमी बजेटसाठी हे ठिकाण खूप चांगले आहे. नेपाळमध्ये ५ ते ६ दिवसांच्या टूरसाठी प्रत्येक व्यक्तीला २५ ते ३० हजार रुपये खर्च साधारणपणे येईल. तुम्ही कमी बजेटमध्ये नेपाळमधील सुंदर मठ, माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प, मंदिरे इत्यादींना भेट देऊ शकता. दिल्ली ते काठमांडूवरुन फ्लाइट सहज मिळू शकते. दीड तासात नेपाळला पोहोचता येते. तसेच बस सेवा देखील उपलब्ध आहे.

भारतातून प्रवास करण्यासाठी खिशाला परवडणारा देश शोधत असाल तर थायलंड ही जागा चांगली आहे. या ठिकाणी तुम्हाला आधुनिक- सांस्कृतिक, भव्य शाही राजवाडे, प्राचीन अवशेष पाहायला मिळते. या ठिकाणी राहाण्यासाठी तुम्हाला जवळपास १२०० रुपये मोजावे लागतील. एका व्यक्तीसाठी ७ दिवसांच्या सहलीचा खर्च ३०,००० रुपये इतका येतो.

बाली हे भारतीय पर्यटकांमध्ये सर्वाधिक मागणी असलेले आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे. येथील बेटांचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. यामुळे वर्षभर या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात या ठिकाणी भेट देता येईल. ५ ते ६ दिवसांसाठी प्रवास करत असाल तर ४० हजार रुपये इतका खर्च येऊ शकतो.

तैवानची नाइटलाइफ ही अनेकांना भूरळ घालते. रात्रीच्या वेळी येथील सौंदर्य पाहाण्यासारखे आहे. या ठिकाणाची खडक आणि त्याच्या आजूबाजूला असणारी छोटी बेटे. येथे हॉटेलचा दिवसाला खर्च हा १७००-२००० रुपये इतका आहे. या ठिकाणी ४ ते ५ दिवसांची ट्रिप प्लॅन करु शकता.

कमी खर्चात दुबईतील ग्लॅमरस डेस्टिनेशनचा प्लान तुम्ही करु शकता. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला फ्लाइटसाठी १७,५०० रुपये मोजावे लागतील तर हॉटेलसाठी २ ते ३ हजार रुपये खर्च करावे लागतील. तर ६ दिवसांसाठी प्रति व्यक्तीचा खर्च हा ४० ते ५० हजार इतका आहे.