By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:17 IST
1 / 7अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हापासून ग्रीनलँड विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हापासून या आर्क्टिक बेटाची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. डेन्मार्कच्या अखत्यारीत येणारे हे बेट केवळ राजकारण किंवा रिअल इस्टेटचा मुद्दा नाही, तर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. २.१६ दशलक्ष चौरस किलोमीटरचा हा अफाट प्रदेश आपल्या कुशीत अनेक रहस्ये दडवून बसला आहे.2 / 7ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे (ऑस्ट्रेलिया हा खंड मानला जातो). विशेष म्हणजे, याच्या ८० टक्के भागावर बर्फाची जाड चादर पसरलेली आहे. येथील लोकसंख्या अवघी ५६,४८० असून, हा जगातील सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेला प्रदेश आहे.3 / 7हे वाचून तुम्हाला धक्का बसेल, पण इतक्या मोठ्या देशात एका शहराला दुसऱ्या शहराशी जोडणारा एकही रस्ता किंवा रेल्वे मार्ग नाही. शहराच्या आत रस्ते आहेत, पण ते शहराबाहेर पडताच संपतात. इकडे प्रवासासाठी लोक विमान, बोट, हेलिकॉप्टर किंवा कुत्र्यांनी ओढल्या जाणाऱ्या 'स्लेज'चा वापर करतात.4 / 7येथील ८८ टक्के जनता इनुइट वंशाची आहे. त्यांना कोणी 'एस्किमो' म्हटलेले अजिबात आवडत नाही. हे लोक स्वतःला 'इनुइट' किंवा 'ग्रीनलँडर' म्हणवून घेणे पसंत करतात. येथे दरवर्षी २५ मे ते २५ जुलाई या काळात सूर्य कधीच मावळत नाही. रात्री १२ वाजताही सूर्य आकाशात चमकत असतो, ज्याला 'मिडनाइट सन' म्हणतात. २१ जून हा येथील सर्वात मोठा दिवस असून तो राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो.5 / 7बर्फाने वेढलेल्या या बेटाला 'ग्रीनलँड' नाव का पडले? तर, 'एरिक द रेड' नावाच्या एका व्यक्तीने लोकांना इकडे आकर्षित करण्यासाठी हे नाव दिले होते. मात्र, शास्त्रज्ञांच्या मते २५ लाख वर्षांपूर्वी ग्रीनलँड खरंच खूप हिरवेगार होते. येथील लोक ग्रीनलँडिक आणि डॅनिश या दोन्ही भाषा बोलतात. 'कयाक' आणि 'इग्लू' हे शब्द मुळात याच ग्रीनलँडिक भाषेतून जगभर प्रसिद्ध झाले आहेत.6 / 7देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल एक चतुर्थांश लोक राजधानी नूकमध्ये राहतात. हे शहर आधुनिक कॅफे, फॅशन बुटीक आणि म्युझियम्सनी नटलेले आहे. ग्रीनलँडची अर्थव्यवस्था प्रामुख्याने मासेमारीवर अवलंबून आहे. येथील लोक मासे आणि सीफूडशिवाय इतर सर्व गोष्टी आयात करतात. व्हेल आणि सीलच्या शिकारीवर येथे कडक नियम आहेत.7 / 7ग्रीनलँड हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर अमेरिकेचा भाग असला तरी, राजकीयदृष्ट्या तो 'किंगडम ऑफ डेन्मार्क'च्या अंतर्गत येतो. २००९ पासून येथील सरकारला अधिक स्वायत्त अधिकार मिळाले आहेत. इतिहासकारांच्या मते, ख्रिस्तपूर्व २५०० वर्षांपूर्वी मानवाने पहिल्यांदा या बेटावर पाऊल ठेवले होते. १३ व्या शतकात आशियातून आलेल्या लोकांचे पूर्वज आजही येथे आपल्या परंपरा जपून आहेत.