शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : जपान ट्रिप प्लॅन करताय? 'हे' ५ कडक नियम वाचल्याशिवाय विमान पकडू नका, नाहीतर…

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:57 IST

1 / 7
जपान हे तंत्रज्ञानासोबतच शिस्त आणि स्वच्छतेसाठी जगप्रसिद्ध आहे. पर्यटकांच्या एका छोट्या चुकीमुळे त्यांना मोठा आर्थिक दंड किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे 'लँड ऑफ रायझिंग सन'ला जाण्यापूर्वी हे नियम जाणून घेणे फायद्याचे ठरेल.
2 / 7
जर तुम्ही परदेश पर्यटनाचा प्लॅन करत असाल आणि तुमच्या यादीत जपानचे नाव असेल, तर तिथे जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची गाठ बांधणे गरजेचे आहे. जपानमध्ये आधुनिकतेपेक्षा सामाजिक शिष्टाचाराला जास्त महत्त्व दिले जाते. भारतीयांसाठी जपानमधील काही नियम थोडे कठीण वाटू शकतात, पण तिथल्या शिस्तीचा भंग केल्यास तुम्हाला महागात पडू शकते. विशेषतः रस्त्यावर कचरा फेकणे किंवा गोंधळ घालणे तुम्हाला थेट जेलची वारी घडवू शकते.
3 / 7
जपानमध्ये शिस्तीची सुरुवात रांगेपासून होते. रेल्वे असो, बस असो वा एखाद्या हॉटेलबाहेरची वाट पाहणे असो, जपानी लोक अत्यंत संयमाने रांगेत उभे राहतात. गर्दी पाहून मध्येच शिरणे किंवा रांग मोडणे हे तिथे अत्यंत उद्धटपणाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे तुमची वेळ येईपर्यंत शांतपणे रांगेत उभे राहणेच हिताचे आहे.
4 / 7
जपानमधील रस्त्यांवर तुम्हाला कचराकुंडी शोधूनही सापडणार नाही, तरीही रस्ते आरशासारखे चमकतात. याचे कारण म्हणजे जपानी लोक आपला कचरा स्वतःजवळ ठेवतात आणि घरी नेऊन त्याची विल्हेवाट लावतात. सार्वजनिक ठिकाणी रॅपर किंवा बाटल्या फेकल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो आणि काही प्रकरणांत तुरुंगवासही होऊ शकतो. तुमचा कचरा एका पिशवीत ठेवा आणि हॉटेलवर गेल्यावरच तो फेका.
5 / 7
जपानी लोक शांततेला खूप महत्त्व देतात. विशेषतः ट्रेन किंवा बसमध्ये प्रवास करताना फोनवर मोठ्याने बोलणे किंवा जोरात हसणे तिथे इतरांना त्रासदायक वाटते. प्रवासादरम्यान फोन सायलेंटवर ठेवा आणि जर बोलणे खूपच महत्त्वाचे असेल, तर अतिशय धीम्या आवाजात बोला.
6 / 7
स्वच्छता आणि पावित्र्य जपण्यासाठी जपानमध्ये घराच्या आत चपला किंवा बूट घातले जात नाहीत. घराच्या प्रवेशद्वारावर 'गेंकान' नावाची जागा असते, तिथेच बूट उतरावे लागतात. हा नियम केवळ घरांनाच नाही, तर मंदिरे आणि काही पारंपारिक हॉटेल्सनाही लागू होतो. विशेष म्हणजे बाथरुमसाठी तिथे वेगळ्या चपला असतात, त्या घालून घराबाहेर येणे अस्वच्छ मानले जाते.
7 / 7
रस्त्यावरून चालता चालता खाणे हे जपानमध्ये असभ्यपणाचे मानले जाते. अन्नाचा अपमान आणि घाण पसरण्याची भीती यामुळे हा नियम पाळला जातो. जर तुम्ही एखाद्या दुकानातून किंवा वेंडिंग मशीनमधून खाण्यासारखे काही घेतले, तर तिथेच एका बाजूला उभे राहून खा किंवा बागेतील बाकावर बसून आरामात खाण्याचा आनंद घ्या.
टॅग्स :Japanजपानtourismपर्यटन