By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:34 IST
1 / 6निसर्गाची किमया पाहायची असेल, तर गुजरातच्या कच्छमधील मिठाच्या अथांग वाळवंटाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. जिथे नजर जाईल तिथे फक्त पांढरी शुभ्र चादर पसरल्यासारखे वाटते. अनेक राजघराण्यांचा इतिहास लाभलेल्या या भूमीचे सौंदर्य चांदण्या रात्रीत तर शब्दांच्या पलीकडे असते. 2 / 6सध्या येथे 'रण उत्सव' मोठ्या थाटामाटात सुरू असून जगभरातून पर्यटक या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी गर्दी करत आहेत. दरवर्षी डिसेंबर ते मार्च या काळात भारत-पाक सीमेजवळील 'धोरडो' गावात रण उत्सवाचे आयोजन केले जाते. 3 / 6कच्छी कलाकारांची हस्तकला, पारंपरिक लोकनृत्य आणि कच्छी संगीताचा मधुर मिलाफ या उत्सवात पाहायला मिळतो. गुजरातची समृद्ध संस्कृती जवळून अनुभवण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते.4 / 6पर्यटकांच्या सोयीसाठी गुजरात पर्यटन मंडळाकडून धोरडो गावात खास 'टेंट सिटी' उभारली जाते. इथे तुम्हाला बेसिकपासून प्रीमियमपर्यंत सर्व सोयींनीयुक्त टेंट उपलब्ध आहेत. या टेंटमध्ये राहून सकाळी पांढऱ्या वाळवंटातील सूर्योदय आणि रात्रीचा चंद्राचा प्रकाश पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. यासोबतच स्थानिक लज्जतदार खाद्यपदार्थांची मेजवानी पर्यटकांचे मन जिंकून घेते.5 / 6सिंधू संस्कृतीचे दर्शन घडवणारे धोलावीरा हे पौराणिक शहर इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी खास आहे. काळा डोंगर हे कच्छमधील सर्वात उंच शिखर असून, इथून पाकिस्तानची सीमा आणि रणचा विहंगम नजारा दिसतो. मांडवी बीच उंटाची सवारी आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. शांतता हवी असणाऱ्यांसाठी पिंगळेश्वर बीच हा सोनेरी वाळूचा किनारा म्हणजे स्वर्गच!6 / 6कच्छला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ 'भुज' आहे. भुजवरून टेंट सिटीला जाण्यासाठी सुमारे दीड ते दोन तास लागतात. तुम्ही अहमदाबाद किंवा राजकोटवरून बस किंवा टॅक्सीनेही आरामात पोहोचू शकता.