1 / 7सामान्यतः वर्षभरात वेगवेगळ्या महिन्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव येतो. निसर्गाचे हे चक्र ठरलेले असते. पण, तुम्ही कधी अशा ठिकाणांबद्दल ऐकले आहे का, जिथे ऋतू बदलण्यासाठी महिने नाही तर अवघे काही तास पुरेसे असतात? होय, हे अगदी खरे आहे! जगभरात अशी काही आश्चर्यकारक आणि सुंदर पर्यटन स्थळे आहेत, जिथे तुम्ही केवळ एकाच दिवसात सगळ्या ऋतूंचा अनुभव घेऊ शकता. सकाळी कडक ऊन, दुपारी पाऊस आणि संध्याकाळ होईपर्यंत तिथे थेट बर्फवृष्टी सुरू होते.2 / 7जर तुम्हीही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल आणि तुम्हाला निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार जवळून अनुभवायचा असेल, तर जगातील 'या' ५ खास ठिकाणांना नक्की भेट द्या!3 / 7डेनवर (अमेरिका) : अमेरिकेतील डेनवर हे शहर प्रसिद्ध 'रॉकी' पर्वतांच्या अगदी जवळ स्थित आहे. पर्वतांच्या सानिध्यामुळे येथील हवामान खूपच लहरी आहे. इथे सकाळी छान ऊन पडलेले असते, दुपारी अचानक वादळी पाऊस सुरू होतो आणि संध्याकाळ ते रात्रीपर्यंत हुडहुडी भरणारी थंडी वाजायला लागते. एकाच दिवसात निसर्गाचे अनेक रंग अनुभवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.4 / 7इंटरलेकन (स्वित्झर्लंड) : स्वित्झर्लंडमधील इंटरलेकन हे शहर चारही बाजूंनी विस्तीर्ण 'आल्प्स' पर्वतरांगांनी वेढलेले आहे. पर्वतांच्या या भौगोलिक रचनेमुळे येथील हवामानात अत्यंत वेगवान बदल होतात. एकाच दिवसात कधी कडक ऊन, तर कधी अचानक कोसळणारा पाऊस आणि सोसाट्याचा थंड वारा पर्यटकांना वेगवेगळ्या ऋतूंची सफर घडवून आणतात.5 / 7लडाख (भारत) : या यादीत आपल्या देशातील 'लडाख' या निसर्गरम्य ठिकाणाचाही समावेश आहे. लडाख हे अतिशय उंचावर वसलेले असल्यामुळे येथील हवामान सतत बदलत असते. दिवसा लडाखमध्ये आकाश एकदम निरभ्र निळे असते आणि कडक ऊन जाणवते. मात्र, काही वेळातच अचानक चक्रीवादळासारखे थंड वारे वाहू लागतात, काळे ढग जमा होतात आणि बर्फवृष्टी होऊन संपूर्ण वातावरण थंडगार होऊन जाते.6 / 7रेकजाविक (आइसलँड) : आइसलँडमधील रेकजाविक हे ठिकाण पर्यटकांचे आवडते केंद्र आहे, पण येथील हवामानाचा अंदाज लावणे कठीण आहे. इथे कधी अचानक कडक ऊन पडेल आणि कधी काही मिनिटांतच हाडे गोठवणारे थंड वारे वाहू लागून पाऊस सुरू होईल, हे सांगता येत नाही. इथल्या निसर्गाचा हाच लहरीपणा पर्यटकांना अधिक आकर्षित करतो.7 / 7क्वीनस्टाउन (न्यूझीलंड) : न्यूझीलंडमधील क्वीनस्टाउन हे शहर आपल्या कमालीच्या बदलणाऱ्या हवामानासाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथील अल्पाइन हवामान इतक्या वेगाने बदलते की त्याला 'फोर सीझन्स इन वन डे' म्हटले जाते. इथे सकाळी एकदम स्वच्छ, कडक ऊन पडलेले असते. मात्र, काही तासांतच अचानक ढग दाटून येतात, मुसळधार पाऊस पडतो, धुक्याची चादर पसरते आणि थेट बर्फवृष्टीही सुरू होते.