Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:37 IST2026-04-06T17:30:20+5:302026-04-06T17:37:12+5:30

योग्य नियोजन आणि स्मार्ट खर्चाच्या जोडीने तुम्ही भारतातील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणांना १० हजार रुपयांच्या आत भेट देऊ शकता.

प्रत्येकाला वाटतं की आपण जगाच्या कोपऱ्यात फिरायला जावं, पण अनेकदा बजेट आडवं येतं. जर तुमच्या खिशात फक्त १० हजार रुपये असतील, तर तुम्ही विचार करत असाल की एवढ्या पैशात काय होणार? पण थांबा! योग्य नियोजन आणि स्मार्ट खर्चाच्या जोडीने तुम्ही भारतातील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणांना १० हजार रुपयांच्या आत भेट देऊ शकता. चला तर मग, जाणून घेऊया अशाच काही पॉकेट फ्रेंडली ठिकाणांबद्दल...

वर्कला (केरळ): केरळमधील वर्कला हे ठिकाण सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्रिवेंद्रमपासून ट्रेनचे तिकीट केवळ ५० रुपये आहे. इथे स्वस्त होमस्टे आणि खाण्याचे उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने बॅकपॅकर्ससाठी हे नंदनवन आहे.

जैसलमेर (राजस्थान): ऐतिहासिक किल्ले आणि वाळवंटाचा आनंद घेण्यासाठी जैसलमेर उत्तम आहे. ट्रेनने प्रवास केल्यास ३ दिवसांची ट्रीप साधारण ५,५०० रुपयांत पूर्ण होऊ शकते. इथली संस्कृती आणि वाळवंटातील कॅम्पिंग तुम्हाला आयुष्यभराची आठवण देईल.

गोवा: गोवा म्हणजे फक्त महागड्या पार्ट्या असं नाही. जर तुम्ही बसने प्रवास केला (सुमारे ८०० रुपये भाडे), तर बजेटमध्ये गोवा फिरता येतो. दक्षिण गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे आणि स्वस्त होमस्टे निवडून तुम्ही १० हजारांत गोव्यात आनंद घेऊ शकता.

कुल्लू (हिमाचल प्रदेश): कुल्लूमध्ये तुम्ही ४ दिवसांची ट्रीप अवघ्या ५,००० रुपयांत पूर्ण करू शकता. कुल्लूच्या जवळच रशोल आणि कसोल ही ठिकाणे असल्याने तुम्ही कमी खर्चात जास्त फिरण्याचा आनंद घेऊ शकता.

हेमिस (लडाख): लेह जवळील हेमिस हे अतिशय साधे आणि शांत ठिकाण आहे. मनाली ते लेह असा प्रवास तुम्ही ट्रक किंवा बसच्या सहाय्याने केवळ ५०० रुपयांत करू शकता. इथे राहण्याचा आणि खाण्याचा खर्च अतिशय कमी असून, ज्यांना साधेपणा आवडतो त्यांच्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

कौसानी (उत्तराखंड): हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले कौसानी हे गाव एखाद्या पोस्टकार्डसारखे सुंदर दिसते. दिल्लीपासून इथे पोहोचणे सोपे आहे. इथे दिवसाचा खर्च साधारण १,५०० रुपये येतो. कोणत्याही महागड्या टूर पॅकेजशिवाय तुम्ही स्वतः ऑनलाइन माहिती घेऊन हे ठिकाण फिरू शकता.

तवांग (अरुणाचल प्रदेश): तवांग हे एक अतिशय शांत आणि सुंदर हिल स्टेशन आहे. इथे पर्यटकांची गर्दी कमी असल्याने तुम्ही मनसोक्त निसर्गात रमू शकता. आसाममधील तेजपूर रेल्वे स्टेशनवर उतरून तुम्ही बसने तवांगला पोहोचू शकता, ज्याचे भाडे केवळ २०० रुपये आहे. इथे राहण्याचा आणि खाण्याचा खर्च साधारण ३,००० रुपयांच्या आसपास येतो.