By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:21 IST
1 / 7भविष्यात जेव्हा वरच्या जगात गर्दी वाढेल, तेव्हा मानवी जीवन कसं असेल? याचं उत्तर फिनलंडची राजधानी हेलसिंकीने आजच जगाला दिलं आहे. हेलसिंकीने चक्क जमिनीच्या खाली एक संपूर्ण हायटेक शहर वसवले आहे.2 / 7सुमारे १ कोटी क्युबिक मीटर क्षेत्रात पसरलेल्या या भूमिगत जगात २०० हून अधिक सुविधा असून, हे शहर केवळ संरक्षणासाठी नाही, तर मौजमजेसाठीही एक उत्तम केंद्र बनले आहे. सुरुवातीला या भूमिगत शहराची पायाभरणी केवळ युद्धाच्या छायेखाली संरक्षणासाठी करण्यात आली होती. येथे ५,५०० नागरी संरक्षण निवारे बांधण्यात आले आहेत, जिथे आणीबाणीच्या काळात ९ लाखांहून अधिक लोक सुरक्षित राहू शकतात. 3 / 7मात्र, आज ही जागा फक्त निवारा राहिलेली नाही. येथे अलिशान स्विमिंग पूल, शॉपिंग मॉल्स, जिम आणि बँड रिहर्सल रूम्स देखील आहेत. येथील इटास्कुस स्विमिंग हॉल इतका लोकप्रिय आहे की, दरवर्षी सुमारे पावणेचार लाख लोक या अंडरग्राउंड स्टीम रूम्स आणि पूल्सचा आनंद घेतात. लहान मुलांसाठी हेलसिंकीने जमिनीखाली ३० मीटर खोल 'प्ले केव्ह' तयार केली आहे.4 / 7कृत्रिम हिरवे गवत, बॉल पिट्स, ट्रॅम्पोलिन आणि घसरगुंडीने सजलेले हे मैदान मुलांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. विशेष म्हणजे, येथे थेट मेट्रोने पोहोचता येते आणि पूर्णपणे सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे.5 / 7क्रीडाप्रेमींसाठीही येथे खास व्यवस्था आहे. जमिनीखाली आठ मजले खाली 'मौनुला स्पोर्ट्स हॉल' आहे, जिथे टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग आणि डान्सचे वर्ग चालतात. या खोलवरच्या भागातही शुद्ध हवा मिळावी यासाठी हायटेक व्हेंटिलेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे. इतकेच नाही, तर रेसिंगच्या शौकीनांसाठी ३०० मीटर लांबीचा कार्टिंग ट्रॅक देखील जमिनीच्या खाली धूळ उडवत आहे.6 / 7हेलसिंकीचे हे मॉडेल केवळ पर्यटनासाठी नाही, तर ते ऊर्जा बचतीचेही उत्तम उदाहरण आहे. जमिनीखालील डेटा सेंटर्समधून निर्माण होणारी उष्णता पाईपलाईनद्वारे वरच्या इमारतींना गरम ठेवण्यासाठी वापरली जाते. ही 'डिस्ट्रिक्ट हिटिंग' सिस्टीम जगासाठी एक आदर्श ठरली आहे.7 / 7'काम्पी अंडरग्राउंड सिटी' या मॉडेलचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. येथे मेट्रो स्टेशन, शॉपिंग स्टोअर्स, रेस्टॉरंट्स आणि चर्च हे सर्व काही जमिनीखाली असून ते थेट सार्वजनिक वाहतुकीशी जोडलेले आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि शहरी नियोजनाचा हा अद्भुत संगम आज संपूर्ण युरोपसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.