देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या ट्रेन कल्याणला थांबतात, पण 'डेक्कन क्वीन' नाही; वाचा भन्नाट कारण

By देवेश फडके | Published: March 3, 2021 03:08 PM2021-03-03T15:08:19+5:302021-03-03T15:16:14+5:30

मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वेसेवांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली गाडी म्हणजे डेक्कन क्वीन. (Deccan Queen) गेल्या ९० वर्षांपासून डेक्कन क्वीनने आपली परंपरा कायम राखली आहे. खऱ्या अर्थाने डेक्कन क्वीनचा थाट राजेशाही आहे. मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वगळता अन्यत्र कुठेही ही गाडी थांबत नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सुमारे ९०० गाड्या कल्याण स्थानकावर थांबतात. मात्र, डेक्कन क्वीन याला अपवाद आहे. वाचा, ही रंजक गोष्ट... (the reason behind why superfast deccan queen not halt at kalyan junction)

भारतीय रेल्वेला मोठीच ऐतिहासिक परंपरा आहे. त्यातच मुंबई आणि पुणे ही दोन महाराष्ट्रातील आपले वेगळेपण, महत्त्व आणि इतिहास जपणारी शहरं. या दोन शहरांना जोडणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आहेत.

मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वेसेवांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली गाडी म्हणजे डेक्कन क्वीन. गेल्या ९० वर्षांपासून डेक्कन क्वीनने आपली परंपरा कायम राखली आहे. आता, तर डेक्कन क्वीनचे पारंपरिक डबे काढून अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. (know about the reason behind why superfast deccan queen not halt at kalyan junction)

LHB डब्यांमुळे डेक्कन क्वीनच्या वेगात आणखी भर पडणार आहे. प्रशस्त जागा, वेगवान प्रवासाची क्षमता, आरामदायी आसनव्यवस्था ही डेक्कन क्वीनची खास वैशिष्ट्ये. डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार सुविधा ही भारतातील अन्य कोणत्याही गाडीमध्ये उपलब्ध नाही.

खऱ्या अर्थाने डेक्कन क्वीनचा थाट राजेशाही आहे. काही वर्षांपूर्वी या गाडीला सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला. मुंबई-पुणे प्रवासामध्ये कित्येक प्रवासी डायनिंग कारमध्ये बसावयास जागा मिळावी, यासाठी नंबर लावून ताटकळत उभे राहतात. आकर्षक अंतर्गत रचनेमुळे डेक्कन क्वीनची डायनिंग कार प्रसिद्ध आहे.

०१ जून १९३० रोजी डेक्कन क्वीन म्हणजेच दख्खनची राणी सुरू करण्यात आली. तिचा उपयोग प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांना मुंबई व पुणे दरम्यान प्रवासासाठी करण्यात येत असे. सुरुवातीला केवळ शनिवार आणि रविवार धावणारी ही ट्रेन प्रचंड प्रतिसादामुळे दररोज चालवली जाऊ लागली.

मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वगळता अन्यत्र कुठेही ही गाडी थांबत नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सुमारे ९०० गाड्या कल्याण स्थानकावर थांबतात. मात्र, डेक्कन क्वीन याला अपवाद आहे. (Deccan Queen not halt at Kalyan Junction)

वास्तविक पाहता मुंबईकरांसाठी कल्याण हे स्थानक अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच कल्याण स्थानक उत्तर आणि दक्षिण भारताला जोडते, असेही म्हटले जाते. असे असूनही मुंबई आणि पुणे या महत्त्वाच्या शहराला जोडणारी डेक्कन क्वीन कल्याण स्थानकात न थांबण्यामागे विशेष कारण आहे.

डेक्कन क्वीनची सेवा सुरू झाल्यानंतर कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून रेल्वे धावत होती. याबाबत रेल्वे काही कर कल्याण नगरपालिकेला देणे लागत असे. परंतु अनेक वर्षे हा कर नगरपालिकेला दिलाच नाही. कर चुकवल्यामुळे संतापलेल्या कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले.

तत्कालीन न्यायालयाने कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला. यानंतर कल्याण नगरपालिकेने डेक्कन क्वीनचे इंजिन जप्त केले. या प्रकारानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन नगरपालिकेचा कर भरला आणि जप्त केलेले डेक्कन क्वीनचे इंजिन सोडवून घेतले.

आपला हा अपमान आणि नामुष्की रेल्वेला सहन झाली नाही. नगरपालिकेची कृती रेल्वे कधी विसरली नाही. म्हणूनच रेल्वेने डेक्कन क्वीन ही गाडी कल्याण स्थानकावर कधीच न थांबवण्याचा निर्णय घेतला. या खटल्यात कल्याण नगरपालिकेची बाजू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती, असे सांगितले जाते.

आताच्या घडीला डेक्कन क्वीन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटल्यावर थेट कर्जतला थांबते. यानंतर लोणावळा, शिवाजीनगर आणि पुणे या स्थानकांवर डेक्कन क्वीनला थांबे देण्यात आले आहेत.

प्रवाशांमधील लोकप्रियता आणि प्रचंड मागणी यांमुळे डेक्कन क्वीनचे थांबे वाढवावेत, अशी मागणी कित्येकदा रेल्वेकडे करण्यात आली आहे. मात्र, रेल्वेकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

केवळ धोरणापलीकडेही अनेक कारणे रेल्वेकडून दिली जात आहेत. डेक्कनला सुपरफास्ट गाडीचा दर्जा देण्यात आला आहे. या गाडीच्या थांब्यामध्ये वाढ झाली तर गाडीच्या वेळात फरक पडेल आणि त्यामुळे गाडीचा सुपरफास्ट हा दर्जा राहणार नाही.

रेल्वेकडून यांसारखी कारणे पुढे करत डेक्कन क्वीनला नवीन थांबे दिले जात नसल्याचे सांगितले जाते. मुंबई-पुणे या शहरांना जोडणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या दररोज धावत असल्या, तरी मुंबई-पुणे या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी डेक्कन क्वीन या गाडीचे एक विशेष स्थान आहे.

आगामी कालावधीत डेक्कन क्वीनची डायनिंग कार वातानुकुलित करण्यावर विचार सुरू आहे. डेक्कन क्वीनला एलएचबी डबे जोडण्याचा विचार मध्य रेल्वेकडून सुरू असून, हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास डेक्कन क्वीनचे डायनिंग वातानुकूलित झाल्याचे पाहायला मिळू शकते.