अतिथि देवो भव : पर्यटकांचा निम्मा खर्च देणार 'हा' सुंदर देश!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 04:38 PM2020-05-27T16:38:50+5:302020-05-27T16:50:29+5:30

कोरोना संकटामुळे जगभरातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे लोक त्यांच्या घरात कैद झाले आहेत.

पर्यटनालाही बंदी असल्यामुळे लोक बाहेर जाणे टाळत आहेत. दरम्यान, जपानने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खास पॅकेज जाहीर केले आहे.

पर्यटकांना आपल्या देशात आकर्षित करण्यासाठी जपान सरकारने १८.2 बिलियन डॉलर खर्च करणार असल्याचे जाहीर केले आहे. पर्यटकांच्या प्रवासाचा निम्मा खर्च सरकार देणार आहे.

निम्मा खर्च दिल्यानंतर पर्यटक जपानमध्ये फिरण्यासाठी आकर्षित होतील, अशी आशा आहे. या योजनेची सविस्तर माहिती अद्याप जारी व्हायची आहे, असे जपानमधील पर्यटन एजन्सीचे प्रमुख हिरोशी तबाता यांनी सांगितले.

द जपान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सरकारने सांगितले आहे की, नवीन योजना जुलैपर्यंत सुरु होऊ शकते. दरम्यान, सध्या जपानमध्ये पर्यटनाला बंदी आहे.

गेल्या सोमवारी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आणीबाणी हटविली. त्यानंतर येथील पर्यटन एजन्सीने यासंदर्भातील निर्णय जाहीर केला.

लॉकडाऊनमुळे जपानमध्येही अनेक लोक घरातूनच काम करत आहेत. तर शाळा सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत जपानमध्ये कोरोनाचे 16628 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 851 लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशातून कोरोनाचा प्रादुर्भाव संपला आहे, असा याचा अर्थ नाही, असे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशातून आणीबाणी हटविताना म्हटले होते.

मात्र, पंतप्रधान शिंजो आबे यांनी कोरोनाच्या लढाईत जपानला यश मिळत आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न केला.