भारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 01:30 PM2018-09-24T13:30:24+5:302018-09-24T13:39:52+5:30

भारत देशाला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अनेक राजे-महाराजे, सम्राट इथे होऊन गेलेत. या इतिहासाच्या खुणा अजूनही टिकून आहेत. अनेक प्राचीन मंदिरं, भव्य राजवाडे, महाल, किल्ले अशा वास्तूंमधून या वारशाचं दर्शन घडतं. त्यातील नऊ वास्तूंमध्ये दडलेली रहस्य चकित करणारी आहेत. चला बघू या, कोणत्या आहेत या वास्तू आणि काय आहे त्या ठिकाणामागील रहस्य....

लेपाक्षी मंदिर... आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षी मंदिर हा अद्भुत शिल्पकलेचा आणि वास्तुरचनेचा नमुना आहे. या मंदिरातील खांब जमिनीला टेकलेले नाहीत. या मंदिरातील स्तंभ हवेत झुलत राहतात.

आग्र्याचा किल्ला... सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्र्याच्या ताजमहालला येणारे पर्यटक आग्र्याचा किल्लाही आवर्जून पाहतात. या किल्ल्यात अनेक ठिकाणी गुप्त खजिना असल्याचं मानलं जातं.

मैसूर पॅलेस... मैसूरचा भव्य-दिव्य पॅलेसही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हा राजवाडा पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. परंतु, ४०० वर्षांपासून हा पॅलेस शापित मानला जातो. या राजवाड्याला काहीतरी शाप आहे आणि त्यामुळेच राजघराण्यात मुलगा जन्माला येत नसल्याचा समज आहे.

मत्तानचेरी महाल... केरळमधील कोची इथला मत्तानचेरी पॅलेस हा डच पॅलेस म्हणूनही ओळखला जातो. तो पोर्तुगीजांनी बांधला आहे. या महालातील फ्लोअरिंग अन्य कुठल्याही महालात पाहायला मिळत नाही. पॉलिश्ड ब्लॅक मार्बलसारखं दिसणारं हे फ्लोअरिंग नारळाच्या जाळलेल्या करवंट्या, कोळशाची भुकटी, लिंबू आणि अंड्यातील पांढऱ्या भागापासून तयार करण्यात आलंय.

चारमीनार... हैदराबादमधील चारमीनार ही वास्तू अनेक वर्षं पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आलीय. या वास्तूमधील भुयारात खजिना दडला असल्याचं मानलं जातं.

बुलंद दरवाजा... मुघल सम्राट अकबराने फतेहपूर सिकरी इथे बांधलेला बुलंद दरवाजा हे जगातील सगळ्यात मोठं प्रवेशद्वार आहे. या दरवाज्यात एक गुप्त भुयार असून त्याचं एक टोक लाल किल्ल्यापर्यंत जातं, तर दुसरं एका सुरक्षित घरात घेऊन जातं.

गोल घुमट... कर्नाटकातल्या विजापूरमधील गोल घुमट हा वास्तुरचनेचा अलौकिक नमुना आहे. पोकळ भिंती असलेला हा भारतातील हा एकमात्र मकबरा आहे.

व्हिक्टोरिया महल... शहाजहानच्या ताजमहालपेक्षा सुंदर वास्तू आपण साकारू शकतो, हे दाखवण्यासाठी ब्रिटिशांनी व्हिक्टोरिया स्मारक उभारलं. ही वास्तू भव्य झाली खरी, पण ताजमहालच्या सौंदर्याशी तिची बरोबरी होऊ शकत नाही.