शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! ४० मजली इमारतही ठेंगणी पडेल इतकी अवाढव्य आहे 'ही' गुहा; तुम्ही पाहिली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:52 IST

1 / 6
निसर्ग हा नेहमीच मानवी कल्पनेच्या पलीकडे असतो, याचा प्रत्यय व्हिएतनाममधील 'सन डूंग' या गुहेकडे पाहिल्यावर येतो. ही केवळ दगडांची बनलेली पोकळी नाही, तर पृथ्वीच्या पोटात वसलेली एक स्वतंत्र आणि जिवंत सृष्टी आहे. ३० लाख वर्षांचा इतिहास लाभलेली ही गुहा इतकी विशाल आहे की, तिच्या आत चक्क ढग तरंगतात, नद्या वाहतात आणि घनदाट जंगलेही डोलतात.
2 / 6
जगातील या सर्वात मोठ्या गुहेचे रहस्य उलगडल्यानंतर आता जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. व्हिएतनामच्या 'फोंगन्हा-के बांग नॅशनल पार्क'मधील दाट झाडीत लपलेली ही गुहा कित्येक शतके जगाच्या नजरेपासून दूर होती. १९९१ मध्ये एका स्थानिक शेतकऱ्याने पहिल्यांदा या गुहेचे प्रवेशद्वार पाहिले.
3 / 6
२००९ मध्ये 'ब्रिटिश केव रिसर्च असोसिएशन'च्या पथकाने याचे वैज्ञानिक सर्वेक्षण केले, तेव्हा ही जगातील सर्वात मोठी नैसर्गिक गुहा असल्याचे सिद्ध झाले.'सन डूंग'चा आकार पाहिला तर आपल्या जगातील मोठ्या वास्तूही लहान वाटू लागतात. ही गुहा सुमारे ९ किलोमीटर लांब आणि १५० मीटर रुंद आहे. या गुहेची उंची तब्बल २०० मीटर (सुमारे ६५० फूट) आहे. याचा अर्थ यात ४० मजली इमारत किंवा एखादे बोइंग ७४७ विमान सहज मावू शकते.
4 / 6
या गुहेचे स्वतःचे एक वेगळे पर्यावरण आहे. लाखो वर्षांपूर्वी गुहेच्या छताचा काही भाग कोसळल्याने तिथे सूर्याचा प्रकाश पोहोचू लागला. या प्रकाशामुळे गुहेच्या आतच झाडे-वेली आणि शेवाळ वाढले असून, तिथे आता एक मोठे जंगल तयार झाले आहे. या भागाला 'गार्डन ऑफ अॅडम' म्हटले जाते.
5 / 6
विशेष म्हणजे, गुहेच्या आत एक वेगाने वाहणारी नदी देखील आहे. आतील आर्द्रतेमुळे तिथे ढग तयार होतात, जे या गुहेला अधिक रहस्यमयी बनवतात. निसर्गाचा हा वारसा जपण्यासाठी व्हिएतनाम सरकारने अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. ही गुहा सर्वसामान्यांसाठी खुली नाही. वर्षाला केवळ ठराविक पर्यटकांनाच तिथे जाण्याची परवानगी दिली जाते.
6 / 6
इथे पोहोचणे हे जगातील सर्वात कठीण साहसांपैकी एक मानले जाते. यासाठी मोठी ट्रेकिंग, गिर्यारोहण आणि नद्या पार कराव्या लागतात. निसर्गाची ही कलाकृती आपल्याला आठवण करून देते की, मानवापेक्षा निसर्ग कितीतरी पटीने शक्तिशाली आणि गूढ आहे.
टॅग्स :Vietnamविएतनामtourismपर्यटन